Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामनसेच्या उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद... पूरग्रस्तांकडे केलेल्या दुर्लक्षाचा उपरकर यांनी केला निषेध...

मनसेच्या उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद… पूरग्रस्तांकडे केलेल्या दुर्लक्षाचा उपरकर यांनी केला निषेध ; प्रशासनच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित…

मालवण, ता. १४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत. पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी न करता केवळ सावंतवाडी मतदार संघाचा दौरा केला. त्यांच्यासह शिवसेना खासदार, आमदारही पूरग्रस्तांना दिलासा देण्यास फिरकले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यास मनसेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले.
मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या उपोषणात मनसे, स्वाभिमान, शिवसेना, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या उपोषणास देवबाग संघर्ष समितीने पाठिंबा दिला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स, सचिव विल्सन गिरकर, संकेत वाईरकर, गुरू तोडणकर, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत गावडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष देवानंद चिंदरकर, सचिव प्रकाश मुननकर, माजी सरपंच उल्हास तांडेल, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेवक राजन सरमळकर, दाजी सावजी, दिलीप घारे, डॉ. सदाशिव राऊळ, मोहन कुबल, अल्बर्ट रॉड्रिक्स, मनोज खोबरेकर, उपसरपंच तमास फर्नांडिस यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते.
मुसळधार पाऊस व त्यामुळे महापूर, उधाणाचा समुद्र किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. देवबाग, तळाशील दुभंगण्याची स्थिती निर्माण झाली होती. काळसे, बागमळा येथील घरे पाण्याने वेढली गेली. तिलारी, खारेपाटण, कुडाळ, बांदा, मसुरे, काळसे, कालावल आदी गावांमध्येही पूरस्थितीमुळे अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांनी दौरा करायला हवा होता. मात्र सावंतवाडी मतदार संघ वगळता ते अन्यत्र फिरकलेच नाहीत. मालवण देवबाग गावाचा दौरा जाहीर करून ग्रामस्थांच्या भीतीने त्यांनी हा दौराच रद्द केला. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी देवबाग ख्रिश्‍चनवाडीतील ग्रामस्थांची भेट न घेताच पळ काढला होता. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून हे उपोषण छेडण्यात आले असल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.
मनसेतर्फे छेडलेल्या उपोषणात अनेकांनी देवबाग गावाच्या हितासाठी आणि निद्रिस्त शासनाला जाग आणण्यासाठी हे उपोषण असल्याने त्यात सहभागी झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान तहसीलदार अजय पाटणे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई दिली जाईल. पतन विभागाने आवश्यक त्याठिकाणी बंधार्‍यांची दुरुस्तीसाठी पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानंतर श्री. उपरकर यांनी दुपारी उपोषण स्थगित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments