एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी नवीन कायदा होणार… येत्या २३ ऑगस्टला अध्यादेश निघणार ; आम. वैभव नाईक यांची माहिती…

2

मालवण, ता. १३ : केरळच्या धर्तीवर एलईडीच्या मासेमारीवर कडक कारवाईसाठी नवीन कायदा बनविण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या २३ ऑगस्टला अध्यादेश काढला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात पर्यावरण मंत्री रामदास कदम, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी बैठक घेत आढावा घेतला अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमारांना एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मच्छीमारांकडून सातत्याने कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर जून महिन्यात आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून मुंबईत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस पर्यावरणमंत्री रामदास कदम, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार वैभव नाईक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ, मत्स्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नवीन कायदा करताना मच्छीमारांना काय अपेक्षित आहे याची माहिती जाणून घेण्यात आली. यात मच्छीमारांनी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाच्या मागणीसह अन्य महत्त्वाच्या बाबी मांडल्या. या बाबींचा नवीन कायद्यात अंतर्भाव केला जाईल असे या बैठकीत स्पष्ट केले होते.
मासेमारी हंगामात एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत असल्याने एलईडीच्या मासेमारीवर कडक कारवाईसाठी नवीन कायदा बनविण्याची कार्यवाही सुरू आहे. यात मच्छीमारांनी मांडलेल्या विविध सूचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे. याचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पर्यावरण मंत्री रामदास कदम, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव, उपायुक्त श्री. चौगुले अन्य अधिकारी उपस्थित होते. येत्या २३ ऑगस्टला याबाबतचा अध्यादेश काढला जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले.

15

4