शिक्षका विरोधात ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी उठविला आवाज; गटविकास विकास अधिकाऱ्यांना विचारला जाब
कणकवली, ता.१३ : तालुक्यातील नागवे कुंभारवाडी शाळेमधील विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याबाबत संतप्त पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना मंगळवारी धारेवर धरले. विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकून मारहाण करणारे शिक्षक श्रीकृष्ण नानचे यांची तातडीने बदली करा अन्यथा बदली होई पर्यंत शाळेत मुले न पाठविण्याचा इशारा देण्यात आला आहे़. पहिल्यांदाच गटविकास अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला आहे़.
कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना नागवे कुंभारवाडी शाळा व्यवस्थापन समिती व पालक संघ नागवेच्यावतीने मंगळवारी जाब विचारण्यात आला़. यावेळी कुंभारवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अध्यक्ष सचिन खेडेकर, उपाध्यक्ष अनुक्ती माजगांवकर, महेंद्र कुडाळकर, उपसरपंच आरोही सांगवेकर, श्रीहरी गुडेकर, चैताली माजगांवकर, दिपाली सांगवेकर, गौरी खेडेकर, अनघा माजगांवकर, सतीश हुले, रसिका सांगवेकर, भिकाजी मोर्ये, नितीशा खेडेकर, संतोष कुडाळकर, प्रमोद सांगवेकर, सावळाराम माजगांवकर, अशोक नांदगांवकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़.
प्राथमिक शाळा कुंभारवाडी येथील शिक्षक श्रीकृष्ण नानचे हे आमच्या शाळेत आल्यापासून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत आहे़. विद्यार्थ्यांचा कान पिरगळून जखमा होईपर्यंत त्रास देत आहेत़. डोक्याच्या मागील मेंदूवर लाकडी पट्टीने मारणे, डोके धरून विद्यार्थ्यांना बाकावर आपटणे, पोषण आहार दिल्यानंतर जबरदस्तीने विद्यार्थ्यांना जेवण्यास प्रवृत्त करणे, जेवण सांडल्यास विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत आहेत़. नानचे शिक्षक म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा असल्याचा आरोप यावेळी व्यवस्थापन समितीकडून करण्यात आला़. झालेल्या अत्याचाराचा पाढाच गटविकास अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांनी मांडला़. त्यामुळे आमची मुले शाळेत जाण्यास घाबरत आहेत़ चुकीच्या पध्दतीने शिक्षकांकडून धमकी दिली जात आहे़ घरी सांगितल्यास अजून मारहाण करेन, अशीही तंबी दिली जाते़. कुमारी दिक्षा माजगांवकर हिच्या डोळ्याला आंदुर्ली आलेली असताना नकळत आंब्याचा पाणांचा डिंग घातला गेला़. यासारखे अमानुष कृत्य या शिक्षकाकडून केले जात आहे़. विद्यार्थ्यांना न शिकवता डिजिटल बोर्डवर अभ्यासक्रम सुरू ठेवून कार्यालयात जावून शिक्षक नानचे बसत आहेत़. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम झाला आहे़ अशा शिक्षकाला आमच्या शाळेत न ठेवता बदली करा तोपर्यंत शाळेत मुले न पाठविण्याचा इशारा पालकांनी दिला आहे़. यावेळी चौकशी करून बदली करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी दिले़.