माजी खासदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ; आकर्षक पारितोषिके…
मालवण, ता. १३ : नगरसेवक यतीन खोत पुरस्कृत व सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्यावतीने महिलांसाठी जिल्हास्तरीय भव्य नारळ लढविणे स्पर्धा १४ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास माजी खासदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
जिल्ह्यात प्रथम महिलांसाठी नारळ लढविण्याची स्पर्धा खोत दांपत्याने येथे सुरू केली. यंदा स्पर्धेचे सहावे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही बंदर जेटी येथे जिल्हास्तरीय भव्य नारळ लढविण्याची स्पर्धा घेण्यात येत आहे. स्वराज्य महिला ढोल-ताशा पथक स्पर्धेचे खास आकर्षण असणार आहे. नारळ लढविणे स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना सोन्याची नथ, पैठणी व आकर्षक चषक दिला जाणार आहे. यावर्षी लहान मुलांबरोबर इतरांसाठीही लकी ड्रॉ ठेवण्यात आला असून आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धकांना नारळ आयोजकांकडून पुरविले जाणार आहेत. या स्पर्धेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.