परशुराम उपरकर: जनतेची पुन्हा फसवणूक होणार
कणकवली.ता,१४: विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळातील शेवटची डीपीडीसी सभा आज होत आहे. या सभेत पालकमंत्री नेहमीप्रमाणे घोषणांचा पाऊस पाडतील. मात्र त्यांनी जाहीर केलेली कुठलीही योजना तीन महिन्यात पूर्ण होणार नाही. त्यामुळे शेवटच्या डीपीडीसी सभेत देखील जनतेची फसवणूक करण्याचाच प्रयत्न करतील अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, गेल्या साडे चार वर्षात पालकमंत्र्यांनी अनेकविध घोषणा केल्या. अनेक विकासकामांची भूमिपूजने केली. पण यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. आजच्या जिल्हा नियोजनच्या सभेत देखील ते पुन्हा एकदा चतुर्थीला चिपी विमानतळावर विमान उतरेल अशी घोषणा करतील. प्रत्यक्षात विमान काही उतरणार नाही. पालकमंत्र्यांनी काजू कलम बांधण्याची योजना आणली होती. त्यासाठी 35 लाख रूपये कृषि विभागाने कृषि विज्ञान केंद्र किर्लोसकडे हस्तांतरित केले होते. मात्र ही योजनाच पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे कृषि विभागाने 35 लाख रूपयांचा निधी परत मागितला आहे. एवढी नामुष्की पालकमंत्र्यांनी आणली असल्याचे श्री.उपरकर म्हणाले.