Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासंदीप मेस्त्री मित्रमंडळाने २०० पुरग्रस्त कुटुंबाना दिली थेट मदत

संदीप मेस्त्री मित्रमंडळाने २०० पुरग्रस्त कुटुंबाना दिली थेट मदत

कोल्हापुर जिल्ह्यातील कागल येथील पुरग्रस्तांना दिलासा; कलमठ प्रतिष्ठानचे कौतुक

कणकवली, ता.१४ : मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हानी झाली. पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नाणीबाई, चिखली, बाणगे या तालुक्यातील पुरग्रस्तांना कणकवली तालुक्यातील कलमठ येथील संदीप मेस्त्री मित्रमंडळ आणि कलमठ प्रतिष्ठान यांच्यावतीने तब्बल २०० कुटुंबाना प्रत्येक घरात जाऊन मदत देत या मित्रमंडळाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र याचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने दळणवळण यंत्रणा कोलमडण्याबरोबरच अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. पुराच्या पाण्याने अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते केले. अनेकांच्या संसाराची होळी झाली. महाराष्ट्रातुन सर्वच बाजुने पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झालाच होता. त्याचबरोबर सिंधुदुर्गातुनही पुरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत देण्यासाठी हात सरसावले. यामध्येच कलमठ येथील संदीप मेस्त्री मित्रमंडळ आणि कलमठ प्रतिष्ठान यानी सहभाग घेत माणुसकीचे दर्शन घडवले. पुरग्रस्तांसाठी ५ किलो तांदुळ, १ किलो तुरडाळ, १ किलो कांदे, १ किलो बटाटे, ५ लिटर पाणी कॅन यासाह साबण, टुथपेस्ट, फिनेल, बिस्कीट, कफसिरीफ, टॉनीक, लहान मुलांचे कपडे,चटई, साड्या, शाल, चहा पावडर, तेल, दुध पावडर, मच्छर अगरबत्ती, मेणबपत्ती, माचीस बॉक्स, टुथब्रश, डॉक्सीगोळ्या यासारख्या साहीत्याचे २०० पॅकेट तयार करत थेट प्रत्येक पुरग्रस्ताच्या घरी जात हे साहीत्य सुपुर्द केले. यावेळी संदीप मेस्त्री, नितीन पवार, परेश कांबळी, धिरज मेस्त्री, गणेश तळगांवकर, ओंकार मेस्त्री, विजय इंगळे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर कांदळकर, केतन दळवी, जयेश मेस्त्री, सचिन वाघेश्री, नवनाथ चव्हाण, अरविंद पाटील, शाम पोयेकर, नितेश मेस्त्री यानी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सहभाग घेतला होता. यावेळी कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नाणीबाई, चिखली, बाणगे या गावातील २०० कुटुंबाना थेट मदत देेण्यात आली. याबाबत माहिती देताना संदीप मेस्त्री म्हणाले, सिंधुदुर्गातुन आम्ही थेट पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी कागल तालुक्यातील दाखल झाल्यानंतर आमच्याकडील साहीत्य काही मंडळीनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही पुरग्रस्तांच्या हातातच साहीत्य देणार असल्याचे सांगितलेे. यावेळी आम्हाला या मंडळीनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या निर्णयाचे स्थानिक बाधित तरुणानी स्वागत करत आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे तेथील स्थानिक पुढारी यानी काढतापाय घेतला. म्हणुनच ३ गावात आम्हाला थेट पुरग्रस्तांना साहीत्य वाटप करता आले. खास सिंधुदुर्गातुन आम्ही राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पुरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुरगुड आणि चिखली येथे आरोग्य केंद्रामध्ये मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे संदीप मेस्त्री यानी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments