जिल्हा नियोजनच्या सभेत विरोधकांकडून अधिकारी टार्गेट

304
2

सिंधुदुर्गनगरी ता.१४
जिल्हा नियोजन सभेत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सत्ताधारी व विरोधकांनी टार्गेट केले. यामुळे जिल्ह्यातील अधिकारी कामे करीत नाहीत, यालाही दुजोरा मिळाला.
सभागृहात सुरु असलेल्या कविवर्य मंगेश पाडगावकर स्मारकाच्या विषयाचा धागा पकडत जिल्हा पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी पर्यटन विकासाची कामे कोणती केली ? असा प्रश्न करीत सतीश सावंत यांनी त्यांना धारेवर धरले. यानंतर आ नितेश राणे यांनी पालकमंत्री केसरकर मोठ्या प्रमाणात निधी आणत असताना काम होताना दिसत नाही, अशी कोपरखळी मारली. यावर आ वैभव नाईक यांनी पर्यटन अधिकारी गेल्या पाच वर्षात कार्यालयात मिळत नाही, असा आरोप केला. त्यानंतर खा विनायक राऊत यांनी स्वदेश दर्शन योजनेचे 14 कोटी निधी मिळाला असताना माने यांनी एकही रुपया खर्च केला नाही. असा अकार्यक्षम अधिकारी या जिल्ह्यात असणे म्हणजे दुःख आहे. त्यामुळे त्यांची बदली करा, असे सांगितले. त्याला सर्वानीच पाठिंबा दिला. त्यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे सभागृहाच्या भावना त्यांच्या वरिष्ठाना पाठवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करा, असे सांगितले.
यानंतर अंकुश जाधव यांनी मागासवर्गीय हॉस्टलचा विषय काढला. यावरून त्यांची पालकमंत्री केसरकर यांच्या बरोबर खडाजंगी झाली. त्यावर केसरकर यांनी आक्रमक रूप धारण करीत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांना तुमच्या सारखा निष्क्रिय अधिकारी मी पाहिला नाही, असे सांगितले. तसेच माझे पत्र घेवून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, असे आदेश दिले.
यानंतर पाटबंधारे विभागाचा विषय येताच खा विनायक राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील काळे यांच्या एवढा फितूर अधिकारी पाहिला नसल्याचा आरोप केला. यावेळी वीज वितरणचे अधीक्षक, भारत संचार निगमचे अधिकारी, जिल्हा मत्स्य अधिकारी यांनाही सभागृहात टार्गेट करण्यात आले.

4