वेंगुर्ले.ता,१४: वेंगुर्ले तालुक्यात आज समुद्र किनाऱ्यावर ठिकठिकाणी पारंपारिक पध्दतीने नारळी पौर्णिमा उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. पुरोहितांच्या मंत्रपठनाने सागराला नारळ अर्पण करून त्याची भक्तीभावाने पूजा केली. वेंगुर्लेचे पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांनी प्रथम समुद्राला नारळ अर्पण करुन पुजा केली.
वेंगुर्ले बंदरावर आज दुपारपासूनच सागराला नारळ अर्पण करण्यासाठी भाविक गर्दी करु लागले होते. वार्षिक प्रथेनुसार पोलिसांनी सागराला पहिल्या मानाचा नारळ अर्पण केल्यानंतर शेकडो भाविकांनी सागराला नारळ अर्पण करून प्रार्थना केली. येणारा मासेमारी काळ सर्व मच्छिमार बांधवांसाठी सुखमय जावो अशी प्रार्थना यावेळी मच्छीमार बांधवानी सागराला करुन प्रत्येकाने आपल्या नौकेची पुजा करुन समुद्राला नारळ अर्पण करत मच्छीमाराचे संरक्षण करा अशी प्रार्थना केली. शासनाने जाहीर केलेला मत्स्यबंदीचा काळ एक आॅगस्ट पासूनच संपला असला तरी खरा मच्छिमारी काळ आज पासून म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून सुरु होतो. आज वेंगुर्लेतील असंख्य मच्छीमार बांधवांनीदेखील आपल्या मच्छीमारी नौकेचे तसेच सागराची विधीवत पूजा करून आपापल्या नौका समुद्रात लोटल्या व मासेमारीचा शुभारंभ केला. वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनीही सहपत्नी सागराला नारळ अर्पण करुन सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.