किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे श्रीफळ सागरास अर्पण ; शिवकालीन नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात…
मालवण, ता. १४ : शिवकालीन परंपरा लाभलेला नारळी पोर्णिमेचा सण आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे श्रीफळ सागराला अर्पण झाल्यावर मालवण व्यापारी संघ, मच्छीमार बांधवांच्यावतीने सागरास श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी ‘एलईडीच्या भस्मासूरापासून आमचे रक्षण कर, मत्स्यहंगाम बहरू दे, व्यवसायात बरकत दे’ असे साकडे मच्छीमार, व्यापारी बांधवांच्यावतीने सागरास घालण्यात आले.
नारळी पोर्णिमेच्या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. दरवर्षी किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे सोन्याचा मुलामा असलेले श्रीफळ सागरास अर्पण केल्यावर व्यापारी, मच्छीमार बांधव सागरास श्रीफळ अर्पण करतात. यावर्षीही शहरातील व्यापारी बांधव वाजतगाजत मिरवणूकीने सायंकाळी बंदर जेटी येथे दाखल झाले. यात मिरवणुकीत शहराध्यक्ष उमेश नेरूरकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये, परशुराम पाटकर, नितीन वाळके, सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बाळा पारकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, विजय नेमळेकर, नितीन सापळे, दीपक केळुसकर, संजय गावडे, गणेश प्रभुलीकर, बाळू अंधारी, मुकेश बावकर, राजा शंकरदास यांच्यासह अन्य व्यापारी बांधव यात सहभागी झाले होते. नारळी पौर्णिमेनिमित्त बंदर जेटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
किल्ले सिंधुदुर्गवरून सायंकाळी सव्वा चार वाजता मानाचे श्रीफळ अर्पण झाल्यानंतर व्यापारी, मच्छीमार बांधवांच्यावतीने श्रीफळ सागरास अर्पण करण्यात आले. एलईडीच्या भस्मासूरापासून आमचे रक्षण कर, मासेमारी हंगाम बहरू दे, व्यवसायात बरकत मिळू दे असे साकडे मच्छीमार, व्यापार्यांच्यावतीने सागरास घालण्यात आले. शहरातील चिवला वेळा, धुरीवाडा, दांडीसह तालुक्याच्या किनारपट्टी भागात नारळी पोर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला. नारळी पोर्णिमेचा सण मच्छीमारांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या सणाच्या निमित्ताने मच्छीमार समाजात उत्साहाचे वातावरण असते. हे चित्र आज तालुक्यातील किनारपट्टी भागात दिसून आले.
नारळी पोर्णिमेच्या निमित्ताने बंदर जेटी परिसरात नगरसेवक यतीन खोत, सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्यावतीने महिलांसाठी जिल्हास्तरीय भव्य नारळ लढविणे स्पर्धा, मालवणी संस्कृती वारसा मंडळाच्यावतीनेही महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा भरविण्यात आली होती. पुरुषांसाठीही नारळ लढविणे स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदर जेटी येथे निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेलाही क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदर जेटी येथे गाबीत समाज बांधवांच्यावतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी स्टॉल उभारण्यात आला. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. धुरीवाडा येथे मच्छीमार समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा करत डोक्यावर कळश्या घेऊन समुद्रकिनारी दाखल होत होत्या. यावेळी ज्येष्ठ महिला नारळ लढविण्यात मग्न झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.