ओटवणे परिसरातील भूस्खलनाचे होणार पुन्हा एकदा सर्वेक्षण…

2

ओटवणे ता.१६:: शिरशिंगे,असनिये,झोळंबे येथे झालेल्या भूस्खलनाचे पुन्हा एकदा तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.यावेळी केंद्र सरकारच्या भूगर्भ तज्ज्ञांमार्फत हे सर्वेक्षण होणार असून,काही ठिकाणी झालेल्या भूस्खलनाची स्थिती धोकादायक असल्याने हा निर्णय घेतला आहे.येत्या दोन दिवसात केंद्र शासनाचे हे तज्ञ सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. यातील अनेक गावांत झालेले भूस्खलन अतिशय धोकादायक स्थितीतील होते.शिरशिंगे येथे भूभागात खाली पडलेले तडे धोकादायक मानले जात होते.याशिवाय असनिये-घारपी मार्गावर तसेच झोळंबे येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून भूस्खलनाचे प्रकार घडले होते.या पार्श्वभूमीवर खा.विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशानुसार स्थानिक भूगर्भ तज्ञांनी असनिये,शिरशिंगे,झोळंबे,येथे सर्वेक्षण केले होते.
दरम्यान, शिरशिंगे,झोळंबे येथे झालेले भूस्खलनाची स्थिती धोकादायक असल्याचे तज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर अधिक सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे.त्यामुळे यापुढील सर्वेक्षण केंद्र सरकारच्या भूगर्भ तज्ज्ञांमार्फत होणार असून,येत्या दोन दिवसात केंद्र शासनाचे हे तज्ञ सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहेत.दरम्यान,ग्रामस्थ शेती-बागायती सोडून आले आहेत.वन्यप्राणी बागायतीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आलेल्या कणेवाडी येथील ग्रामस्थांनी घरी पाठविण्याची मागणी केली आहे.मात्र शासनाकडून नव्याने सेर्वेक्षणाचा निर्णय झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

4