वेंगुर्ले आगाराचे चालक प्रभुखानोलकर यांचा विशेष सत्कार…
सिंधुदुर्गनगरी ता.१६: गाडीचा पुढचा टायर अचानक फुटला असताना प्रसंगावधान दाखवत मालवण येथे संभाव्य अपघात टाळला.तसेच वेंगुर्ले निमुसगा घाटीच्या अतिउतारावर गाडीचे अचानक ब्रेक निकामी झाले असताना विचलित न होता तो सुद्धा अपघात टाळणाऱ्या वेंगुर्ले आगाराचे एसटी चालक दामोदर श्रीधर प्रभुखानोलकर उर्फ साहिल प्रभू यांचा विशेष सत्कार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कणकवली विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी एसटीचे मुख्य कल्याण अधिकारी यांच्या आदेशानुसार केला.
चालक प्रभुखानोलकर हे वेंगुर्ले तालुक्यातील रहिवाशी असून 16 नोव्हेंबर 2015 रोजी मालवण येथे सीएच 7920 ही बस घेवून जात असताना एका मोठ्या उतारावर चालकाच्या पुढील बाजुचा टायर अचानक फुटला. मात्र त्यावेळी त्यांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपल्यातील उत्कृष्ट वाहन चालकाचे कौशल्य दाखवत एसटी रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी उभी करतानाच त्यावेळी तेथून प्रवास करणाऱ्या वाहणांना जराही धोका पोहोचू दिला नाही. यामुळे गाडीतील 50 प्रवाशांचे प्राण वाचले होते.
तसेच 15 जानेवारी 2016 रोजी वेंगुर्ले तालुक्यातील निमुसगा घाटीच्या अतिउतारावर एम एच 20 डी 9456 या त्यांच्या ताब्यातील एसटीचे ब्रेक अचानक निकामी झाले होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी विचलित न होता प्रसंगावधान दाखवत योग्यप्रकारे गाडीचे गियर बदलत व हॅण्ड ब्रेकचा वापर करीत एसटी सुरक्षितपणे रस्त्यावर उभी केली. त्यावेळीही त्यांनी 30 प्रवाशांचे प्राण वाचविले होते.
सेवेत असताना चालक प्रभुखानोलकर यांनी दाखविलेल्या या प्रसंगावधानची दखल एसटी प्रशासनाने घेत त्यांचा 15 ऑगस्ट रोजी विशेष सत्कार केला. याच कारणासाठी त्यांचा वेंगुर्ले नगर परिषदेने 12 फेब्रुवारी 2016 रोजी सिंधु पर्यटन महोत्सवात सिंधु रत्न किताब देवून सन्मान केला होता. एसटी प्रशासनाने केलेल्या या सन्मानाबाबत प्रभुखानोलकर यांचे जिल्ह्यातील एसटी चालक-वाहक कर्मचारी वर्गात अभिनंदन होत आहे.