Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानागरी सेतु सुविधा केंद्र शासकीय कामांमधील वेळेचा अपव्यय टाळणार ...

नागरी सेतु सुविधा केंद्र शासकीय कामांमधील वेळेचा अपव्यय टाळणार …

नगराध्यक्ष गिरप :स्वातंत्र्यदिनी करण्यात आले लोकार्पण…

वेंगुर्ले ता.१६: सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन त्याच्या वेळेचा शासकीय कामांमधील अपव्यय टाळण्याच्या उद्देशाने हे नागरी सेतु सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.हे सुविधा केंद्र पुर्णपणे अद्ययावत व संगणकीकृत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे ठरणार आहे.अशी सुविधा देणारी वेंगुर्ला नगरपरिषद राज्यातील बहुदा पहिली नगरपरिषद असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यदिनी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी गिरप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी वैभव साबळे,पोलिस निरीक्षक शशिकांत खोत,उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर आदि उपस्थित होते. नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन शहरातील ज्येष्ठ नागरिक भास्कर परब, का. हू. शेख, गणपत कासार, मालाकीया डिसोझा, लक्ष्मण उर्फ बाबा हुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत देसाई यांच्या हस्ते झाले. या नागरी सेतु सुविधा केंद्रा मार्फत शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोई सुविधा जसे की, पाणीपट्टी, घरपट्टी व विविधा प्रकारचे दाखले एका खिडकीवर उपलब्ध होणार आहेत. हे केंद्र नगरपरिषदेच्या तळमजल्यावर उभारण्यात आले असल्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग,गर्भवती महिला यांना होणारा त्रास कमी होणार आहे. या सेतु सुविधा केंद्र उद्घाटनाच्या निमित्ताने निवृत्त पोलिस उपायुक्त पदावर काम केल्यानंतर सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण जिल्ह्यात लोकसेवा करता यावी या उद्देशाने मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आलेले भास्कर गंगाराम परब, सैन्यातील सुभेदार या पदावर निवृत्त होऊन माजी सैनिकांच्या कल्याणकारी संस्थेमध्ये कार्यरत असलेले वसंत केशव देसाई, राष्ट्रभाषा हिंदी चळवळीतील अग्रगण्य नाव व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त का.हू. शेख, पेशाने शिक्षिका असलेल्या व शासनाच्या मदतीने पाचशेच्यावर कुष्ठरोगी रुग्णांवर उपचारकरून त्यांना रोगमुक्त करणाऱ्या मालाकीया डिसोझा, १९७१ साली बांगलादेश युद्धात सहभाग घेतलेले व मेजर पदावरून निवृत्त झालेले गणपत तुकाराम कासार,वारकरी संप्रदायाशी संबधित व मच्छीमारांच्या अनेक प्रश्नांवर शासन स्तरावर पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दाजी उर्फ बाबा हुले या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नगर परिषदेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सचिन वालावलकर, राजेश घाटवळ, प्रसन्ना देसाई, उप निरीक्षक रूपाली गोरड, हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश परब, सदानंद गिरप, मेघश्याम मराठे, अ‍ॅड. सुषमा खानोलकर, वृंदा गवंडळकर प्रल्हाद मणचेकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. रमेश परब बोलताना म्हणाले, मी जरी सध्या कुडाळ येथे रुग्णांना सेवा देत असलो तरी वेंगुर्ले या माझ्या जन्मगावी मला कायमस्वरूपी रुग्णसेवा देण्यासाठी यायला नक्कीच आवडेल यावर अध्यक्ष गिरप यांनी लवकरात लवकर इथे येण्याच्या दृष्टीने आपण पायाभूत सुविधा देऊ असे संगितले. या कार्यक्रमास नगरसेवक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments