बोभाटेवाडी येथील घटना: मालवाहू ट्रकची बसली धडक
कणकवली, ता.16 ः देवगड-निपाणी राज्य मार्गावरील तोंडवली-बोभाटेवाडी येथे भरधाव ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार रामा संतू तांबे (वय 21, मूळ रत्नागिरी, सध्या राहणार राजापूर) हा ठार झाला. दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. मालवाहू ट्रक निपाणीहून नांदगावकडे जात होता. अपघातानंतर भरधाव वेगाने जाणारे ट्रक ग्रामस्थांनी अडवून ठेवले होते. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर चार तासांनी हे ट्रक मार्गस्थ करण्यात आले.
देवगड-निपाणी राज्य मार्गावर कर्नाटक राज्यात चिरे घेऊन जाणारी व येणारी वाहने भरधाव वेगाने हाकली जातात. आज निपाणी ते नांदगाव जाणार्या ट्रकने (केए 25 बी 2384) तोंडवली बोभाटेवाडी हुनमान मंदिर नजीकच्या धोकादायक वळणावर रामा सतू तांबे याच्या दुचाकीला धडक दिली. रामा तांबे हा विजापूर येथे जत्रेसाठी जात होता. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारसायकलस्वार ट्रकच्या पुढील बाजूला धडकल्यानंतर मागील चाकापर्यंत फरफटत जात मागील चाकाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला.
देवगड-निपाणी मार्गावर चिरे घेऊन जाणारे ट्रक भरधाव वेगाने जात असल्याने या मार्गावर सतत अपघातांची शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे ट्रक-दुचाकी अपघातानंतर देखील ट्रक भरधाव वेगाने जात होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत देवगड-निपाणी मार्गावरून भरधाव वेगाने जाणारी सर्व वाहने रोखून धरली होती. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक व मोटारसायकल बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.