मला जनतेने दिलेली किंगमेकर पदवी हुलेंना फारच झोबंली…

2

मालवण, ता. १६ : मला जनतेने बहाल केलेली किंगमेकर ही उपाधी नरेश हुले यांना फारच झोंबल्याचे दिसत आहे. मात्र ही उपाधी मला जनतेने माझ्या कार्याचे मूल्यमापन करून जनतेने मायेने, आपुलकीने माझ्या पाठीवर मारलेली माझ्या कर्तृत्वाविषयीची कौतुकाची थाप आहे, हे सारे हुले यांच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे आहे असा टोला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकातून लगावला. कुठल्याही गोष्टीची परिसीमा गाठून त्याचे हसू होईल असे वक्तव्य हुले यांनी करू नये असा सूचक इशाराही आचरेकर यांनी दिला आहे.
मेढा येथील माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे समर्थक नरेश हुले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नरेश हुले आणि सुदेश आचरेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हुले यांनी केलेल्या आरोपांना आचरेकर यांनी सडेतोड उत्तर देत समाचार घेतला. श्री. आचरेकर म्हणाले, नरेश हुले यांचे मेढा प्रभागातील वास्तव्याची वर्षे किती ? याचे आत्मपरीक्षण करावे. शहराच्या राजकारणात, समाजकारणात जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ मी कार्यरत असून या काळात मेढा प्रभागातच नव्हे तर शहर विकासाची अनेक कामे केली. नगराध्यक्ष असताना शहर विकासाचे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. जनतेच्या सुख दुःखात मी सामील झालो असल्याने येथील नागरिकांना मी त्यांच्या घरचा कुटुंबाचा सदस्य असल्याचे वाटते. त्याचा प्रत्ययही अनेकदा आला आहे. लोकांमध्ये असलेले माझे स्थान पाहून हुले यांना याचे शल्य आहे. हुले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शंकर मंदिराचा आपल्या राजकीय फायद्यासाठी आधाराचा टेकू घेऊन ज्या गोष्टी चालविल्या त्या दुर्दैवी आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कारण पुढे करून त्या संबंधात वारंवार बैठक घेत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देवाचा आधार हुले व त्यांच्या सहकार्‍यांनी घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे
माझ्या पायाखालची वाळू सरकल्याची भाषा हुले करीत आहेत ते पाहून मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. वडिलांचा मला राजकीय वारसा आहे. यापूर्वी अनेक संकटांना तोंड दिले आहे. त्यामुळे हुले यांच्या शिवसेना प्रवेशाच्या हलक्याशा झुळुकेला आपण किंमत देत नाही. माझ्या पायाखालची वाळू भक्कम असून त्याची काळजी हुलेंनी करू नये. आमदार वैभव नाईक यांनी मेढा प्रभागातील लोकांची घोर फसवणूक केली असून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जे १० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले. श्री. नाईक यांनी आश्‍वासनाला हरताळ फासल्याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे. नागरिकांचा भ्रमनिरास झाला असून आमदारांबद्दलची विश्‍वासार्हता लयास गेल्याची टीकाही आचरेकर यांनी केली आहे.
पालिकेत पूर्वी प्रशासनात काम केलेले नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने नगरसेवकांना प्रशासनाच्या विरोधात उपोषण छेडावे लागते हा नगराध्यक्षांच्या अपयशाचा पुरावा आहे. नगराध्यक्षांना प्रशासन चालविता येत नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. आज नगराध्यक्ष हे आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
गेल्या तीस वर्षाच्या राजकीय, सामाजीक कार्यकाळात अनेकांना रोजगार मिळवून देण्यास प्रयत्न केले. कुणाचे घरदार पाडण्यात आपल्याला स्वारस्य नाही. राजकीय क्षेत्रात जसा पूर्वी दरारा होता तसाच आजही असून यापुढेही राहील याची नोंद हुले व त्यांच्या सहकार्‍यांनी घ्यावी असे आचरेकर यांनी म्हटले आहे.

15

4