हडी येथे आग लागून अडीच लाखाचे नुकसान

164
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १६ : तालुक्यातील हडी येथील शाळा क्रमांक दोन येथील लवू कावले यांच्या घरास आज रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत सुमारे घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले यात कावले कुटुंबीयांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमन बंबास यश मिळाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- हडी शाळा क्रमांक दोन येथे कावले कुटुंबीयांचे चार बिर्‍हाडांचे एकत्रित घर आहे. यात सध्या दोन बिर्‍हाडे वास्तव्यास आहेत. यातील रमेश कावले यांचे कुटुंबीय आज काही कामानिमित्त बाहेर गेले होते तर लवू कावले यांच्या मंडळी घरातच होती. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक घरास आग लागली. घर कौलारू असल्याने वाशांनी पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच घरातील लहान मुलांसह अन्य मंडळी घराबाहेर पडली. त्यांनी तत्काळ गावातील मंडळींना आग लागल्याची माहिती देताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती मालवणातील नगरसेवक यतीन खोत यांना देताच त्यांनी तत्काळ नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला. हडीचे सरपंच महेश हडकर, संतोष सावंत यांच्यासह अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरवात केली. मात्र आगीचा भडका उडाल्याने घरातील दूरदर्शन संच, फ्रीज तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्य तसेच गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
मालवण पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कौलारू घर असल्याने घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून कावले कुटुंबीयांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

\