गोळी झाडणार्‍यावर कायदेशीर कारवाई व्हावी

2

मनोज मेस्त्री यांची पोलिसांत फिर्याद ः जानवली शिकार प्रकरण

कणकवली, ता.17 ः बंदुकीतून डुक्करावर झाडलेली गोळी आपले काका सखाराम मेस्त्री यांना लागून त्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी आरोपी रविकांत उर्फ बाबू राणे याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी फिर्याद मनोज मंगेश मेस्त्री यांनी कणकवली पोलिसांत दिली आहे. जानवली फणसूली येथील जंगलात डुक्कराची शिकार करताना आरोपी रविकांत राणे याने झाडलेली गोळी सखाराम मेस्त्री यांच्या डोक्याला लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना काल (ता.16) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी रविकांत राणे याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जानवली-फणसूली येथील जंगलात डुक्कर आल्याची माहिती त्या भागातील गुराखी भिकाजी राणे यांनी रविकांत उर्फ बाबू राणे यांना दिली होती. त्यानंतर रविकांत राणे यांनी सखाराम मेस्त्री यांना डुक्कराची शिकार करण्यासाठी बोलावले. त्यांच्यासह जानवली गणपतीवाडी येथील अनिकेत रमाकांत राणे, अक्षय रमाकांत राणे, रजत रमाकांत राणे यांना घेऊन जानवली फणसूली येथील जंगलमय भागात गेले. सायंकाळी 5.30 च्या सुमारास रविकांत राणे यांना जंगली डुक्कर दिसला. त्यावर त्यांनी गोळी झाडली. मात्र ही गोळी तेथीलच एका खडकावर आपटून सखाराम मेस्त्री यांच्या डोकीला लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी जानवली फणसूली येथील जंगलमय भागात जाऊन सखाराम मेस्त्री यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तर आरोपी रविकांत राणे याला अटक केली होती. सखाराम मेस्त्री यांच्या मृत्यू नंतर त्यांचा पुतण्या मनोज मंगेश मेस्त्री यांनी आज कणकवली पोलिसांत फिर्याद दाखल केली. यामध्ये आपल्या काकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

11

4