एम. के. गावडे प्रबोधिनीचे आयोजन
वेंगुर्ले : ता.१७ एम. के. गावडे प्रबोधिनी तर्फे दशावतार कलावंतांचे स्नेहसमेलन मंगळवार २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता साई मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दशावतार लोककला काल, आज आणि उद्या या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. एम.के.गावडे प्रबोधिनी गेली २५ वर्षे सातत्याने दशावतार लोककलेसाठी अनेक प्रकारे सहकार्य करीत आहे. तसेच दरवर्षी दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करून दशावतार कलाकारांना प्रोत्साहित केले जाते. या कार्यक्रमात दशावतारी कलाकार ओमप्रकाश चव्हाण, सुधीर कलिंगण नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पारंपरिक व नवोदित दशावतार कंपन्यांचे मालक व कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच जुन्या दशावतार कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास दशावतार नाट्यप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन एम. के. गावडे प्रबोधिनीचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी केले आहे.