चोरीची फिर्याद घेण्यास नकार दिल्यानंतर प्रेयसी पसार
कणकवली, ता.17 ः मालवण तालुक्यातील एक युवती प्रियकराला न सांगताच मैत्रीणी समवेत चित्रपट पाहण्यासाठी कणकवलीत आली होती. ही बाब प्रियकराला समजताच त्याने चित्रपटगृहात येऊन प्रेयसीचा मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर रागाने लालबुंद झालेल्या प्रेयसीने कणकवली पोलिस स्थानकात येऊन प्रियकराविरोधात मोबाईल चोरीची फिर्याद दाखल करून घ्या असा हट्ट धरला. त्यासाठी तिने डीआयजी कार्यालयात कामास असलेल्या आतेकडूनही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रियकर मोबाईल घेऊन पोलिस ठाण्यात हजर असल्याने, तसेच हा प्रेमाचा मामला असल्याने पोलिसांनी चोरीची फिर्याद घेण्यास नकार दिला. यानंतर ती प्रेयसी तक्रार न देताच आपल्या नातेवाइकांसह आपल्या गावी पसार झाली.
मालवण तालुक्यातील एका युवतीला तिच्या प्रियकराने काही दिवसापूर्वी नवीन मोबाईल घेऊन दिला होता. आज ही युवती आपल्या मैत्रीणी समवेत कणकवलीतील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आली होती. सायंकाळी त्या प्रेयसीच्या प्रियकराला ही बाब समजली. त्याने तातडीने कणकवलीत धाव घेऊन चित्रपटगृहात धाव घेतली. तसेच प्रेयसीला दिलेला मोबाईल काढून घेतला. या प्रकारानंतर ती प्रेयसी कणकवली पोलिस स्थानकात आली. त्यानंतर प्रियकर देखील पोलिस स्थानकात हजर झाला होता. यावेळी या दोघांत समझोता करण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रेयसी ऐकायला तयार नव्हती. तर मोबाईल हिसकावून घेतलेला व्यक्ती मोबाईलसह पोलिस स्थानकात हजर असल्याने चोरीची फिर्याद कशी घ्यायची असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलिस चोरीची तक्रार घेत नसल्याने त्या प्रेयसीने डीआयजी कार्यालयात कामास असलेल्या आपल्या आतेला फोन लावून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्या आतेकडून चोरीची तक्रार दाखल करून घेण्यासाठी दबाव आणला जात होता. सुमारे एक तास हा प्रकार सुरू होता. यावेळी प्रियकराची मित्रमंडळी आणि प्रेयसीचे नातेवाईक चार चाकी वाहनासह पोलिस स्थानकात दाखल झाले होते. दरम्यान सतत मोबाईलवर बोलत असलेल्या त्या युवतीने अचानकपणे कोणतीही तक्रार न देता नातेवाइकांसह आपल्या गावी जाणे पसंत केले. तर मोबाईल काढून घेणारा प्रियकर सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाणे आवारात डोक्याला हात लावून बसला होता.