पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम : रोगाची शक्यता

185
2
Google search engine
Google search engine
Google search engine

फळ संशोधन केंद्राने सुचविलेल्या उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन

वेंगुर्ले : ता.१८सध्या कोकणात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदीकाठचा तसेच इतरही काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व परिस्थितीवर मात करणेसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने सुचविलेल्या उपायांचा अवंलंब करावा असे आवाहन सहयोगी संशोधन केंद्राचे संचालक डॉ.बी. एन. सावंत यांनी केले आहे.
भात पिक फुटवे अवस्थेत असताना मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे भात पिक आडवे होवून लोळत आहे. तसेच खाचरात पाणी साचल्याने पिक कुजण्याची शक्यता असल्याने साचलेले पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी. तसेच शेतातील पाण्याची पातळी ५ से.मी पर्यंत ठेवावी. या अतिरिक्त पावसामुळे भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आवश्यकतेनुसार ट्रायसायक्लॅझोल १० ग्रॅम किंवा आयसोप्रोथिआॅलेन १० मिली प्रती १० ली पाण्यातून फवारणी करावी. नागली या पिकाची नवीन लागवड केलेल्या नागली पिकावर अती पावसामुळे मुळकुज व मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी कॉर्बेडॅझिम या बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रती १० ली पाणी या प्रमाणात जमिनीतून द्यावे. नागली पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आवश्यकतेनुसार ट्रायसायक्लॅझोल १० ग्रॅम किंवा आयसोप्रोथिआॅलेन १० मिली प्रति १० लि पाण्यातून फवारावे. तसेच बहुतेक ठिकाणी वेलवर्गिय भाज्यांमध्ये वेल तयार झालेला आहे. त्यांना काठीचा आधार व मातीची भर द्यावी. भाजीपाला क्षेत्रामध्ये उगवलेल्या तणांची बेणणी करावी. आंब्यामध्ये रोगट व सुकलेल्या फांद्या व बांडगुळे कापुन घ्यावीत व त्याठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. आंब्यावर फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी कॉपर आॅक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लि पाणी किंवा १ टक्का बोर्डोमिश्रण यापैकी एका बुरशीनाशकाची पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. फांदीमर रोगाने मोठ्या फांद्यामधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून त्या ठिकाणी बोर्डोमिश्रणाची पेस्ट किंवा कॉपरआॅक्सीक्लोराइडची पेस्ट लावावी. नारळ व सुपारी पिकावर फळगळ व करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. काजूच्या झाडावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास १५ मि.मी पटाशिच्या सहाय्याने प्रादुर्भावित साल काढून झाडातील रोठ्याला बाहेर काढून मारुन टाकावे व तो भाग २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस ५० मि.ली ५ लि पाण्यामध्ये मिसळून चांगला भिजवावा असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

\