प्रा.अनिल सामंत:आरवली येथे कै.जयवंत दळवी यांचा जयंती साजरी
वेंगुर्ले : ता.१८
थोर साहित्यिक कै.जयवंत दळवींचे लिखाण निर्विष होते, त्यामुळे कुणी दुखावत नसंत. त्यांचे साहित्य वाचताना चेहºयावर एखादी तरी स्मितरेषा उमटते पण तेवढ्यात ते अंतर्मुख करणारे काही तरी सांगतात. विनोदी तसेच करूण दोन्ही विषय ते तेवढ्याच ताकदीने लिहायचे असे प्रतिपादन गोवा येथील प्रा. अनिल सामंत यांनी आरवली येथील कार्यक्रमात बोलताना केले.
साहित्यिक कै. दळवी यांच्या जयंती निमित्त जीवन शिक्षण शाळा,आरवली नं.१ येथे जयवंत दळवी प्रेमी आणि साहित्य प्रेरणा कट्टा यांच्यावतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्योजक रघुवीर मंत्री, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. अनिल सामंत, गजानन मांद्रेकर, लेखिका सौ. वृंदा कांबळी, डॉ. मधुकर घारपुरे, श्री वेतोबा देवस्थानचे मानकरी व उद्योजक सचिन दळवी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रथम प्रा. सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कै. दळवी यांच्या प्रतिमेला श्री. मंत्री यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जीवन शाळेच्या विद्यार्थ्यांचे मनोगत पार पडले. दरम्यान त्यानंतर गोवा येथील श्रध्दा गवंडी यांनी ‘संध्याछाया’ नाटकातील प्रसंगाचे सादरीकरण केले. तर वेंगुर्ले येथील श्री.चैतन्य दळवी यांनी कथा कथन सादर केले. लेखिला सौ. वृंदा कांबळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. एकुणच कै. दळवी यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम उपस्थितांना अनेक विषयावर मार्गदर्शक ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कौलापुरे व प्रास्ताविक अनिल निखार्गे तर पाहुण्यांचा परिचय विनय सौदागर व आभार सचिन दळवी यांनी मानले.