पूरग्रस्तांसाठी वैभववाडीवासियांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत

2

वैभववाडी ता.१८ पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला होता. या आपत्तीत ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना सामाजिक भावनेतून मदत करावी यासाठी वैभववाडीवासीय एकवटले असून त्यांनी केलेली मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांना पोहोचविण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी वैभववाडी तालुकावासीयांच्यावतीने जमा केलेली वस्तू स्वरूपातील मदत घेऊन ५० जणांचे एक पथक कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, गारगोटीला रवाना झाले होते.
वैभववाडी तालुकावासियांच्यावतीने गेले आठ दिवस तालुक्यातून पूरग्रस्तांसाठी अन्न धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आल्या. याला तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जमा झालेले अन्नधान्य, कपडे व इतर साहीत्य घेऊन शुक्रवारी तालुक्यातील सुमारे ५० स्वयंसेवक ट्रक भर माल घेऊन रवाना झाले. अगोदर केलेल्या सर्व्हे प्रमाणे भुदरगड गारगोटी परिसरातील कुर, खानापूर, शिंदेवाडी, कोनवडे इत्यादी काही गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जावून गरजूंना ही थेट मदत स्वयंसेवकांमार्फत देण्यात आली आहे. सुमारे दीडशे ते दोनशे किट तयार करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील मदत या भागात देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मदत कोल्हापूर करवीर तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे.
तहसिलदार रामदास झळके, पोलिस उपनिरीक्षक श्री. शेणवी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून हा सामानाने भरलेला ट्रक रवाना केला. या ट्रक सोबत संतोष टक्के , डाॕ.राजेंद्र पाताडे, मनोज सावंत, महेश रावराणे, विद्याधर सावंत मंगेश चव्हाण, प्रशांत ढवण, तेजस साळुंखे, सचिन सावंत, वैभव रावराणे, नरेंद्र कोलते, संजय शेळके, सचिन रावराणे, नंदू रावराणे, गंगाधर केळकर, गणपत सुतार यांच्यासह ५० स्वयंसेवकांची टीम रवाना झाली होती. त्यांनी पूरग्रस्त भागाला भेटी देऊन माहिती घेऊन गरजूंना संसारोपयोगी वस्तू जवळपास साडेतीन ते चार हजार रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले आहे.

21

4