दाम्पत्य जखमी;प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलविले…
सावंतवाडी ता.१८: डंपरला ओव्हरटेक करताना दुचाकीची समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसून दुचाकीवरून जाणारे कोलगाव येथील दांपत्य जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे.हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास येथील कोलगाव-मियासाब परिसरात घडला.रवींद्र नारायण जाधव (२६) व पुनम रवींद्र जाधव (२५) अशी जखमींची नावे आहेत दरम्यान या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित दुचाकीस्वार हा कोलगाव येथून आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने येत होता.तर स्विफ्ट कार सावंतवाडीहून कोलगावच्या दिशेने जात होती.दरम्यान समोरून जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीची स्विफ्ट कारला जोरदार धडक बसली.यात दुचाकीचे चक्क दोन भाग झाले,तर दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य जखमी झाले आहे.जखमींना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान त्यांना येथीलच एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.