जिल्हा क्रीडा कार्यालय मृत्यूशय्येवर असल्याची शंका… रिक्त पदांमुळे क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम ; रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी…

157
2

मालवण, ता. १८ : जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या मृत्यूशय्येवर आहे की काय अशी शंका व भीती सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाला भेडसावत आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयातील मंजूर बारा पदांपैकी सात पदे रिक्त असल्याने जिल्हा, विभागीय स्पर्धांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तत्काळ भरावीत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्याकडे केली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयात एकूण १२ पदे मंजूर आहेत. यात तालुका क्रीडाधिकारी दोन पदे मंजूर असून एक रिक्त आहे. क्रीडाधिकारी तीन पदे मंजूर असून एक पद रिक्त आहे. क्रीडा मार्गदर्शकाची तीन पदे मंजूर असून तिन्ही पदे रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिक, शिपाई ही पदेही रिक्त आहेत. जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांची रत्नागिरी येथे तर क्रीडाधिकारी श्रीमती मोकाशी यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. जिल्ह्यात एकही शासकीय प्रशिक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार न देता पूर्णवेळासाठी पद भरण्यात यावे. यावर्षी जिल्हा शालेय राज्य स्पर्धेच्या आयोजनापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे ही तफावत दूर करून किमान एक तरी राज्यस्तरीय स्पर्धा मिळवून देण्याची कार्यवाही करावी. जिल्हा क्रीडा कार्यालयातील ही रिक्त पदे भरून जिल्हा, विभागीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडाव्यात यासाठी सहकार्य करावे अशी मागणीही जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.

4