दुसऱ्या दिवशीही मासळी फेकून देण्याची रापणकरांवर वेळ…

178
2

कोळंबीलाही अपेक्षित दर न मिळाल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशा…

मालवण, ता. १८ : जीएसटीच्या कारणामुळे बंद फिशमिलमुळे आजच्या दुसर्‍या दिवशीही चिवला बीच येथील रापणकर संघांना मिळालेली मासळी किनार्‍यावरच टाकण्याची वेळ आली. जाळ्यात मिळालेल्या कोळंबीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा रापणकरांना होती मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे रापणकर मच्छीमारांसमोरील संकटात वाढ होत असल्याचे चित्र किनारपट्टीवर दिसून येत आहे.
फिशमील कंपन्यांनी मागील तीन वर्षाचा जीएसटी भरणा करा. या शासन धोरणानंतर किनारपट्टीवरील सर्व फिशमिल बंद असल्याने मिळणारी छोटी मासळी विक्रीचे संकट मच्छीमारांवर अधिकच तीव्र होऊ लागले आहे. चिवला बीच किनारी मणचेकर रापण संघाने लावलेल्या रापण जाळीत कोळंबी व अन्य छोट्या मासळीची कॅच मिळाली. मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळाल्याने चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या कोळंबीला किलोमागे होलसेल दर अपेक्षित असताना २२५ रुपये किलो दर मिळाला. एकूण ३८० किलो कोळंबी मासळीची विक्री झाली. छोटी कोळंबी खरेदी होत नसल्याने अल्प किमतीत काही शिल्लक टोपल्या विकल्या गेल्या तर मिळालेली अन्य छोटी मासळीची विक्री होत नसल्याने
ती किनार्‍यावरच टाकून देण्यात आल्याचे रापण संघाचे मिलिंद हिंदळेकर यांनी सांगितले.
रापण जाळीत मिळालेल्या खवळी, पेडवे या मासळीची फिशमिल बंद असल्याने विक्री होत नव्हती. अन्य ग्राहकही नसल्याने रापणकर मच्छीमारांनी मासळी किनार्‍यावरच ओतून ठेवली. त्यामुळे मासळीचे ढीग चिवला वेळा किनारी झाले होते. त्यातील चांगली मासळी निवडून घरी नेण्यास मत्स्यखवय्यांची गर्दी उडाली होती.

4