२५ हजारपेक्षा जास्त कुटुंबांना थेट फायदा होणार ; सुविधेचा लाभ घेण्याचे बाबा मोंडकर यांचे आवाहन…
मालवण, ता. १८ : मच्छीमार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी भाजप सरकारने केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र मच्छीमार खाते निर्माण करून खर्या अर्थांने मच्छीमारांना मुख्य प्रवाहात आणण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकर्यांना जसे किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध आहे तशीच मच्छीमारांनाही क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार आहे या सुविधेचा मच्छीमारांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दैनंदिन खर्च व या व्यवसायातील येणार्या खर्चास मदत होणार आहे. यात २ लाखापर्यंत कर्ज २ टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. यात ट्रॉलर, बल्याव, रापणकर, महिला बचतगट या सर्व स्तरातील मच्छीमारांना खर्चानुसार कर्जाची पात्रता निश्चित केली जाणार आहे. यासाठी मच्छीमार व्यावसायिकांनी जिल्ह्यातील आपल्या भागातील मच्छीमार सहकारी संस्थेमध्ये जाऊन आपले नाव, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, मासेमारीचा प्रकार, मासेमारी व्यवसायातील वार्षिक उत्पन्न, बँकेची परिपूर्ण माहिती वैयक्तिकरीत्या नोंदवायची आहे.
जिल्ह्यातील १२१ किलोमीटर अंतरावर वसलेल्या २५ हजारपेक्षा जास्त कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. याबाबतची माहिती संकलनाचे काम सुरू असून या सुविधेचा लाभ सर्व मच्छीमारांनी घ्यावा असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले. यावेळी अवि सामंत, उल्हास तांडेल, दादा वाघ, प्रदीप मांजरेकर, बबलू राऊत उपस्थित होते.