वेंगुर्ले,ता.१६ : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमानाने खास शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य माता-भगिनींसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सद्यस्थितीत सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत, प्रत्येक मुलाला घडविण्यामध्ये गुरुजनासोबत आई-आजी यांचा बहुमोल वाटा असतो,आपल्या पाल्याला सुसंस्कृत करण्यासाठी शाळेत दाखल केल्यानंतर महिला शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक समितीवर सदस्य किंवा पदाधिकारी म्हणून वेळ व सेवा देत असतात, अशा सर्व समिती सदस्य महिलांसाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने ही जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा ठेवली होती.
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कार्य करत असताना या महिलांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, पुढे त्यांनी यातून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा, हा सदर निबंध लेखन स्पर्धेमागील उद्देश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांमधील शाळा व्यवस्थापन व माता – पालक समिती महिला सदस्यासाठी सदर स्पर्धा खुली होती. निबंध लेखनासाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम, आई-बाबांसोबत तुटलेला संवाद’ हा विषय दिलेला होता. या विषयावर अनेक महिलांनी भाष्य करत थक्क करणारे अनुभव लेखन केले.
सिंधुदुर्ग नव्हे तर महाराष्ट्र राज्यात खास महिलांसाठी शालेय व्यवस्थापन स्तरावर प्रथमच आयोजित केलेल्या ह्या जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत ७९ महिलांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
निबंध स्पर्धा: प्रथम: निता नितीन सावंत ( शिरशिंगे, सावंतवाडी), द्वितीय: स्नेहा माणिक चौगुले ( कोकीसरे, वैभववाडी), तृतीय: प्रगती विवेक चव्हाण ( वेंगुर्ले), उत्तेजनार्थ, प्रथम: लावण्या लक्ष्मीकांत देसाई ( कळणे, दोडामार्ग), उत्तेजनार्थ द्वितीय: वर्षा किशोर नेरूरकर (वालावल, कुडाळ) यांनी मिळविला. सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांची चित्रफ्रेम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पी. आर. गावडे यांनी केले. अशी वेगळी निबंध स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अनेक महिलांनी ऋण व्यक्त केले. सर्व सहभागी महिलांना लवकरच सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.