तळाशील समुद्रात बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू….

2

एकास वाचविण्यास यश;सायंकाळची घटना, पोलीस घटनास्थळी दाखल…

मालवण, ता. २१ : तळाशील येथील समुद्रात आज सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एक पर्यटक बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे तर त्याच्या सहकाऱ्यास वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. अमोल करपी (वय-३६) रा. बेळगाव असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
दरम्यान घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरील किनाऱ्यावर आठ वाजण्याच्या दरम्यान अमोल करपी याचा मृतदेह आढळून आला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की- बेळगाव येथील चार तरुण सायंकाळी तळाशील येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास आले होते. यातील अमोल करपी व त्याचा अन्य एक साथीदार हे दोघे पाण्यात उतरले तर अन्य दोघे हे किनाऱ्यावरतीच उभे होते. याच दरम्यान समुद्रातील भोवऱ्याच्या पाण्यात हे दोघेही बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच ललित देऊलकर, प्रमोद चोडणेकर, बाबू तोरसकर, बाबल चोडणेकर, चेतन खवणेकर, प्रमोद तोरसकर, सागर निवतकर यांच्यासह अन्य स्थानिकांनी समुद्रात धाव घेत एकास वाचविले. तर अमोल करपी हा लाटांच्या प्रवाहात समुद्रात बुडून बेपत्ता झाला. स्थानिकांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू होता. यातच आठ वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावरच त्याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर, सुशांत पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू होती. समुद्रात बुडून मृत्यू पावलेला अमोल करपी हा सिव्हील इंजिनियर असल्याची माहिती मिळाली.

4