गणेशोत्सव नियोजन बैठक; भाजी विक्रेते, रिक्षा आणि पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
कणकवली, ता.19 ः गणेशोत्सव कालावधीत कणकवली शहरातील बाजारपेठ मार्गावर एक दिशा मार्गाची कडक अंमलबजावणी होणार आहे. शहरातील पटवर्धन चौक ते संदेश पारकर निवासस्थानापर्यंत हा एक दिशा मार्ग असणार आहे. यात फक्त वाहनांना बाजारपेठेत प्रवेश करता येणार आहे. याखेरीज तेलीआळी डीपी रोड ते आदर्श भोजनालय पर्यंतच्या भागात भाजी विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर डीपीरोड ते बसस्थानकालगतच्या हॉटेल सह्याद्रीपर्यंत दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. याखेरीज लक्ष्मी चित्रमंदिर ते गांगोमंदिर हा नवीन डीपी रस्ता आचरा मार्गावरून येणार्या वाहनांसाठी असणार आहे. नगराध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीत गणेशोत्सव कालावधीमधील नियोजन करण्यात आले.
गणेशोत्सव कालावधीत नियोजनाची बैठक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात आज झाली. यात पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण जाधव, वाहतूक पोलिस विश्वजित परब, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, अभिजित मुसळे, अबिद नाईक, प्रतीक्षा सावंत, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, किशोर राणे यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांच्यासह भाजी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक तसेच विविध मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आले. यात बाजारपेठ आणि महामार्गावर वाहतूक पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. यात तेलीआळी डीपी रोड ते हॉटेल सह्याद्रीपर्यंत वाहन पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. महामार्गावरील उड्डाणपुलासाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेटच्या आतमध्ये हे पार्किंग असणार आहे. याखेरीज तेली आळी डीपी रोडवर एका बाजूने कार पार्किंग करता येणार आहेत. तसेच याच रोडलगतच्या विवेक खोत यांच्या जागेत पार्किंग व्यवस्था आहे. तसेच हॉटेल हॉर्नबिल आणि युको बँक परिसरातही पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
भाजी विक्रेते तसेच मंडपी व इतर साहित्याच्या विक्रेत्यांसाठी तेलीआळी डीपी रोड ते अभ्युदय बँक पर्यंतच्या जागेत हायवे उड्डाणपुलाखालील बॅरिकेट असलेल्या जागेत आपला व्यवसाय करता येणार आहे. कणकवली बाजारपेठेत पटवर्धन चौक ते संदेश पारकर यांचे घर हा रस्ता एक दिशा मार्ग असणार आहे. यात उलट वाहतूक होऊ नये यासाठी पोलिस तैनात केले जाणार आहेत.