वेळागरातील पंचतारांकित “ताज” हॉटेलचा प्रकल्प मार्गी लागल्यात जमा…

2

दीपक केसरकरांचा दावा; जमिन संपादन, नुकसान भरपाईबाबत विशेष निर्णय…

सावंतवाडी,ता.२४: जमिन संपादन आणि नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आल्यामुळे तब्बल २५ वर्षे रखडलेला वेळागर येथील ताज ग्रुपचा पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प मार्गी लागल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांचा फायदा आता परिसराला होणार आहे, असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. दरम्यान मोचेमाड येथील पंचतारांकित हॉटेलला पाणी उपलब्ध झाल्यास महिनाभरात हा सुध्दा प्रकल्प चालून होईल त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प स्थानिकांना रोजगार देणारे मॉडेल ठरेल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
ताज व मोचेमाड येथील पंचतारांकित प्रकल्पाबाबत आज श्री. केसरकर यांनी माजी आमदार शंकर कांबळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यानंतर ही माहिती दिली.
यावेळी केसरकर म्हणाले, वेळागर येथील ताज प्रकल्पाचे काम मागील पंचवीस वर्षापासून होऊ शकले नाही. या प्रकल्पाच्या जमीन संपादन व नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आला असून सध्या शंभर एकर जमिनीची मोजणी सुरू आहे. ताज ग्रुप, पर्यटन महामंडळ व स्थानिक यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना याबाबत नुकसान भरपाई योग्य प्रकारे दिली जाणार आहे तसेच हॉटेल प्रकल्पामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. इच्छुकांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या जमिनीच्या क्षेत्रामध्ये काही घरांच्या भिंती व मंदिरे येत आहेत. त्याबाबतही आज निर्णय घेण्यात आला. महिला बचत गटांना देखील या प्रकल्पामुळे संधी मिळेल स्थानिकांना रोजगार देणारा प्रकल्प म्हणून मॉडेल या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून होईल, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मोचेमाड येथील पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून जवळपास शंभर रूम्स उपलब्ध आहेत. पाण्याअभावी त्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला नाही. मात्र पाण्याची लाईन लवकरच पोहोचली तर एका महिनाभरामध्ये या ठिकाणी हॉटेल सुरू होईल. आपल्या मतदारसंघात हॉटेल प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त करून महिला बचत गटानाही संधी देण्यात येणार असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

4