चतुर्थी पूर्वी तरी हक्काच्या घरात पाठवा….

2

असनियेतील स्थलांतरित कुटुंबियांची आदित्य ठाकरेकडे मागणी….

ओटवणे ता.१९: असनियेत दरडी नजीक असलेली काही घरे हलविण्याची सूचना भूगर्भ तज्ञांनी केली आहे, मात्र येथील परीसर व घरांच्या स्थितीची सर्वाधिक जाण स्थानिकांना आहे.त्यामुळे येथील घरांचे पुर्नवसन करावे,किंवा संरक्षक भिंत व मेटल शीटच्या साह्याने हा परिसर सुरक्षित करावा,याबाबत ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.याबाबत शिवसेना ग्रामस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करेल,असे प्रतिपादन शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी असनिये येथे स्पष्ट केले.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी असनिये येथे कोसळलेल्या दरडींची पाहणी केली.तसेच प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी खा.विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर,जान्हवी सावंत,विक्रांत सावंत,रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.
आमची घरे सुरक्षित आहेत,केवळ अतिवृष्टीमुळे दरड कोसळली आहे.आमच्या शेती बागायतीचे नुकसान होत असून,आम्हाला चतुर्थीच्या तयारीसाठी तात्काळ घरी पाठविण्यात,अशी मागणी ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांच्या समोर केली.मात्र घरी पाठविण्याचा निर्णय 2 दिवसात घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

4