राणेंच्या भाजप प्रवेशाच्या निव्वळ राजकीय वावड्या

211
2

प्रमोद जठार ः स्वाभिमान कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश थांबविण्यासाठीची खेळी

कणकवली, ता.१९ ः माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, ह्या निव्वळ राजकीय वावड्या आहेत. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षातील प्रवेश थांबवण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे. सध्यातरी राणेंचा भाजप प्रवेश माझ्या दृष्टिक्षेपात नाही. कारण राज्यात भाजप-शिवसेना मजबूत आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणूक देखील आम्ही युतीच्या माध्यमातून लढविणार आहोत. पुढचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच असतील असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.
येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवा नेते संदेश पारकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, वाहतूक आघाडी अध्यक्ष शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते.
राज्यात भाजप-शिवसेना युती मजबूत असल्याने राणेंचा भाजपमधील प्रवेश सध्यातरी शक्य नसल्याचे श्री.जठार म्हणाले. स्वाभिमान पक्षातील काही कार्यकर्ते भाजपमध्ये येणार आहेत. त्यांचा भाजपमधील पक्षप्रवेश थांबविण्यासाठी राणेंकडून भाजप प्रवेशाबाबतच्या वावड्या उठवल्या जात असाव्यात असेही ते म्हणाले. तसेच राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत काहीही निश्‍चिती नसली तरी राणेंच्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत आहे असेही श्री.जठार म्हणाले.

4