कोणत्याही परिस्थितीत सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करणार

2

प्रमोद जठार ः कोकणच्या पर्यटन विकासासाठी १५ मेगा प्रोजेक्ट

कणकवली, ता.18 ः कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्गात आम्ही सी वर्ल्ड हा प्रकल्प पूर्ण करूनच दाखवणार आहोत. हा प्रकल्प होण्यासाठी सध्या जगभरातील गुंतवणूकदार आणि या प्रकल्पाची उभारणी करणार्‍या संस्थांशी आमची चर्चा सुरू आहे. या दोन कंपन्या निश्‍चित झाल्यानंतर सी वर्ल्डसाठी आवश्यक त्या जागा विकत घेतल्या जातील. मात्र सी वर्ल्ड आम्ही करूनच दाखवू अशी ग्वाही कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली. तसेच कोकणातील 7 जिल्ह्यात मेगा प्रोजेक्ट उभे करणार आहोत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावांत पर्यटन सुविधांची निर्मिती केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले पर्यटनातूनच कोकणचा खर्‍या अर्थाने विकास होणार आहे. त्यासाठी आम्ही 15 मेगा प्रोजेक्टची निश्‍चिती केली आहे. यात सीवर्ल्डचाही समावेश आहे. त्याचबरोबर देवगड येथे मँगो म्युझियम, देवगड डोंगर ते पवनचक्की डोंगर या दरम्यान काचेचा पूल, सालवा डोंगर आणि माचाळ ही गावे हिल स्टेशन म्हणून विकसित केली जातील. तर गोपुरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योगा केंद्र, आंबोली परिसरात जंगलसफारीचा उपक्रम राबविणार आहेत. रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यातही याच धर्तीवर उपक्रम राबविणार आहोत.
सिंधुदुर्गासह कोकणातील मुंबई, ठाणे वगळता उर्वरीत पाच जिल्ह्यातील प्रत्येकी 100 गावे पर्यटनदृष्ट्या विकसित केली जाणार आहेत. त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांसमवेत मिटींग घेत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक उद्या (ता.20) जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. या बैठकीला महसूल, वन, मेरीटाईम बोर्ड, बांधकाम खात्यांच्या प्रमुखांना बोलाविण्यात आले आहे. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनदृट्या कोणती कामे करतील येतील याबाबत प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. तसेच पर्यटनाच्याअनुषंगाने डाटा संग्रहित केला जाणार असल्याचे श्री.जठार म्हणाले.

सिंधुदुर्गातील उड्डाणपुलांना भूमिपूत्रांची नावे
महामार्ग चौपदरीकरणात तळेरे, कणकवली आणि कुडाळ येथे उड्डाणपूल उभे राहत आहेत. यातील तळेरे येथील उड्डाणपुलाला प्रि.वामनराव महाडीक यांचे नाव दिले जाणार आहे. कणकवलीतील उड्डाणपुलाला अप्पासाहेब पटवर्धन तर कुडाळ येथील उड्डाणपुलाला बॅ. नाथ पै यांचे नाव दिले जाणार असल्याची माहिती श्री.जठार यांनी दिली.
————————-

23

4