खलाशाच्या खून प्रकरणी दुसरा संशयित गजाआड ; डोंबिवलीतून घेतले ताब्यात… २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ; मुख्य संशयित फरारीच…

2

मालवण, ता. १९ : दहा महिन्यांपूर्वी मध्ये गवंडीवाडा समुद्रकिनारी झालेल्या खलाशाच्या खून प्रकरणी पसार असलेला दुसरा संशयित आरोपी मंटू ऊर्फ बंटी सरकार (वय- ३५ रा. पश्चिम बंगाल) याला डोंबिवली मुंबई येथून गजाआड करण्यास मालवण पोलिसांना यश आले. आज त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील दांडी येथील लीलाधर पराडकर यांच्याकडे मासळी उचलण्याच्या कामासाठी खलाशी म्हणून कामास असलेल्या दिलीप (पूर्ण नाव माहीत नाही) या खलाशाचा ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. दिलीप याला दारूचे व्यसन असल्याने पराडकर यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्याला काही पैसे देत तू येथून घरी जा असे सांगितले होते. रात्री जेवण झाल्यानंतर दिलीप व त्याच्यासोबत असलेल्या अन्य तिघांमध्ये वाद झाले होते. यात दुसऱ्या दिवशी दिलीप याचा मृतदेह गवंडीवाडा समुद्रकिनारी आढळून आला होता.
दिलीप याच्या डोक्यावर, शरीरावर गंभीर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. यात त्याचे अन्य तीन सहकारी गायब झाल्याने त्यांनीच दिलीप याला मारल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ते ज्या खोलीत वास्तव्यास होते त्या खोलीची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्या तीन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
या खून प्रकरणी काही दिवसात रवींद्र गुलाब चव्हाण या संशयितास पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेत अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रवींद्रने आपला या खुनाशी संबंध नसून आपल्या जीवास धोका निर्माण झाल्याने पळ काढल्याचे पोलिस तपासात सांगितले. सध्या रवींद्र हा सावंतवाडीत न्यायालयीन कोठडीत आहे.
या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रकाश (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासह दुसरा संशयित बंटी यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. यात बंटी हा डोंबिवली येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सराफदार, अमित हरमलकर, श्रीकृष्ण भोसले, मिलिंद पावसकर यांच्या पथकाने मुंबईतून त्याला ताब्यात घेतले. त्याला आज पहाटे येथे आणत अटक केली. न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत. दरम्यान मुख्य संशयित आरोपी प्रकाश हा फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

1

4