वैद्यकीय अधिक्षकांना विचारला जाब; मराठीतून संवाद साधण्याची मागणी…
सावंतवाडी,ता.३०: येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असलेले डॉक्टर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी हिंदी भाषेत बोलत आहेत. या विरोधात मनसेच्या पदाधिकार्यांनी आज आक्रमक भूमिका घेतली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे यांची भेट घेवून त्यांना मराठीत बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार आपण संबंधितांना सुचना करू, असे आश्वासन ऐवाळे त्यांनी दिले.
रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून बिहार येथील काही डॉक्टर काम करीत आहेत. त्यांच्याकडून रुग्णाशी हिंदी भाषेत संवाद साधला जातो. मात्र अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातून येणारे असल्यामुळे त्यांना भाषा कळत नाही. त्यामुळे संबंधितांना योग्य त्या सुचना देण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी मनसे पदाधिकार्यांकडुन करण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हासंघटक अॅड. अनिल केसरकर, परिवहन जिल्हा संघटक राजू कासकर, बांदा माजी विभाग अध्यक्ष मिलींद सावंत, चिन्मय नाडकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.