कातळावरील हंगामी तलावात मत्स्यबीज वाढीची प्रायोगिक चाचणी… जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ…

260
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १९ : सिंधुदुर्गातील मच्छीमार, मत्स्य विकासासाठी कार्यरत असलेली नीलक्रांती विविध कृषी, मत्स्य, पर्यटन व पतसेवा सहकारी संस्था, प्रगतशील शेतकरी भूषण सुर्वे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मुळदे येथील गोड्या पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प याच्या संयुक्त विद्यमाने कातळावरील पावसाळी हंगामी तलावात भारतातील प्रमुख कार्प गटातील कटला आणि रोहू जातीच्या मत्स्यबीजाची मत्स्यबोटुकली आकारांपर्यंत वाढीच्या प्रायोगिक चाचणीची सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते मत्स्यबीज हंगामी तलावात सोडण्यात आले.
जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे सरासरी ३५०० मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्याचे अनेक भागात हंगामी तलाव तयार होतात. परंतु या तलावाच्या पाण्याचा कोणताही उपयोग होत नाही. या जिल्ह्यात सुमारे २५ लघुपाटबंधारे तलाव, २ मध्यम पाटबंधारे तलाव असून या खाली सुमारे एक हजार हेक्टर एवढे जलक्षेत्र आहे. जिल्ह्यात शासनाच्या शेततळी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततलाव तयार झालेले आहेत. या तलावात बारमाही मत्स्यसंवर्धनास वाव आहे. परंतु जिल्ह्यात यापूर्वी मत्स्यबीज निर्मिती होत नसल्याने या पाणीसाठ्याचा योग्य वापर होत नव्हता पर्यायाने येथील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन नगण्य आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे येथील मत्स्यशेती प्रकल्पांतर्गत नुकतेच मत्स्यबीज निर्मिती केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून यातून मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज तयार केले जाते. परंतु बीजाला योग्य आकारापर्यंत वाढविण्याच्या सुविधा येथे पुरेशा प्रमाणात नसल्याने शेतकर्‍याला मोठ्या आकाराचे बीज तलावात साठवणुकीसाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात पावसाळी हंगामात तयार होणार्‍या तलावात हे बीज वाढवून शेतकर्‍यास फायदेशीर होऊ शकेल का याची पडताळणी करण्यासाठी कोकण प्रांतात प्रथमच कातळावरील पावसाची हंगामी तलावात भारतीय प्रमुख कार्प मासळीच्या बीजाची बोटुकली आकारापर्यंत वाढ तपासण्याकरीता प्रक्षेत्र चाचणी कांदळगाव येथील भूषण सुर्वे यांच्या जागेतील तलावात घेण्यात येत असल्याचे मुळदे मत्स्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत यांनी यावेळी सांगितले.
या चाचणीसाठी नीलक्रांती सहकारी संस्थेने समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी पुढाकार घेऊन नियोजन केलेले असून मुळदे येथील मत्स्यबीज केंद्रात तयार केलेले सुमारे ३० हजार नग मत्स्यबीज या तळ्यात विरळणी केले आहे. सुमारे ३५ ते ३५ दिवसांच्या कालावधीनंतर या बीजाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण तपासले जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढील वर्षापासून जिल्ह्याच्या इतर भागातील हंगामी तलावात अशा प्रकारचा उपक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचा विचार केला जाईल श्री. तोरसकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम कांदळगावात राबविला जात आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास अनेक शेतकरी यातून प्रेरणा घेतील आणि या व्यवसायात उतरतील असा विश्‍वास यावेळी जिल्हाधिकारी श्री. पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.
प्रायोगिक चाचणी मुळदे मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे. मत्स्यबीज सोडण्याच्या उपक्रमास जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुळदे मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत, डॉ. मनोज घुघूसकर, कृपेश सावंत, नीलक्रांतीचे कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, शेतकरी भूषण सुर्वे अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत मत्स्यशेती पुस्तिका देऊन करण्यात आले.