विशाखा वेंगुर्लेकर; पूर्णत्वास नेण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घ्यावा…
वेंगुर्ले ता.१९: तालुक्यातील असोली गावात माध्यमिक शाळे समवेत औद्योगिक प्रशिक्षण केंद्र प्रस्तावित होते.त्यासाठी तत्कालीन संस्थापक अध्यक्ष दादा धुरी यांनी विशेष प्रयत्न केले.परंतु त्यांचे अकाली निधन झाल्यामुळ हे स्वप्न अखेर अधुरे राहिले.आता मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थी व गावातील युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.आणि हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली ठरले,असे प्रतिपादन प्रशालेच्या मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांनी कै.धुरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात केले.येथील आसोली हायस्कूलमध्ये कै.दादा धुरी याचा १४ वा. स्मृतीदिन साजरा करण्यात आला,यावेळी त्या बोलत होत्या.
सौ. वेंगुर्लेकर पुढे म्हणाल्या,वक्तशीर,सौजन्यशील दादांच्या मनात मुलांच्या शिक्षणाविषयी आस्था होती.मागील काळात गावातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी गावाबाहेर सुमारे ५ किलोमीटर अंतरा पर्यंत पायपीट करावी लागत होती.त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परिस्थिती पुढे झुकत ७ वी पर्यंतच्याच शिक्षणावर समाधान मानावे लागत होते.ही शिक्षणाची गंगा गावातील विद्यार्थ्यांच्या दारात यावी या हेतूने त्यांनी आसोली हायस्कुलची स्थापना केली.त्यामुळे ८वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना गावातच मिळू लागले.त्यासाठी त्यावेळच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना मोलाची साथ दिली होती.मात्र या पुढे जात गावातील युवकांना स्वयंरोजगार घेता यावा या उद्देशाने गावात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभी राहावी हे त्यांचे स्वप्न होते.त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नही सुरू केले होते.मात्र दरम्यान त्यांच्या अकाली निधनाने हे स्वप्न गावातील युवकांसाठी अखेर स्वप्नच राहिले.आता प्रशालेत शिकणाऱ्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी हे स्वप्न सत्त्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी वेळप्रसंगी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि ते पूर्ण करावे हीच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खरी आदरांजली ठरेल.
यावेळी कै.धुरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रशालेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कथाकथन आणि कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.दरम्यान या स्पर्धांना विध्यार्थ्यांचा सुद्धा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.यावेळी धुरी कुटुंवियांच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रशालेतील शिक्षक लक्ष्मण शिरोडकर,विष्णू रेडकर,भावना आवळे,चंद्रकांत बर्डे,भास्कर धुरी,पांडुरंग म्हापणकर,साहेबराव पाटकर आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.