डेगवे-तांबुळी रस्त्याची श्रमदानातून डागडुजी…

2

ग्रामस्थांचा पुढाकार:काही ठीकाणी वनविभागाचा अडसर…

ओटवणे ता.२०: डेगवे ते तांबोळी या रस्त्याची ठिक-ठिकाणी दुरवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर तांबोळी ग्रामस्थांनी मंगळवारी या मार्गाची श्रमदानातून डागडुजी केली.तांबोळी पंचक्रोशीतील अनेक गावांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे,मात्र वनविभागाची जमीन येत असल्याने काही ठिकाणी या रस्त्याचे काम रखडले आहे.
बांदा तसेच गोवा येथे जाण्यासाठी तांबोळी पंचक्रोशीतील असनिये,घारपी तसेच फुकेरी गावांसाठी हा मार्ग सर्वात जवळचा आहे.या रस्त्याचे ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र मोयझर येथे या रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो.वनविभागाने या रस्त्याच्या कामास आक्षेप घेतल्याने मोयझर येथे या रस्त्याचे काम रखडले आहे.तांबोळी,असनिये,घारपी या गावांसाठी सर्वात सोईचा मार्ग असुनही पंतप्रधान ग्रामसडक योजना विभाग व वनविभाग यांच्यात समन्वय नसल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे.पालकमंत्री केसरकर यांचे लक्ष वेधुनही त्यांनी दूर्लक्ष केल्याचा आरोप तांबोळी सरपंच अभिलाष देसाई यांनी केला.
दरम्यान, या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत,तसेच झाडी झुडपांनी हा मार्ग वेढलेला आहे.मोयझर येथे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून,तेथे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.या पार्श्वभूमीवर तांबोळी ग्रामस्थांनी एकत्र येत मंगळवारी या रस्त्याची श्रमदानातून डागडुजी केली.ग्रामस्थांनी स्वखर्चातुन खडी, दगड आणून या रस्त्याची दुरुस्ती केली.
यावेळी अभिलाष देसाई, नारायण सावंत,विजय सावंत महेश सावंत शिवराम सावंत,नरसिंग देसाई, बापू तांबुळकर,अरुण सावंत, सचिन सावंत, संभाजी सावंत,रविंद्र देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.

17

4