धुरात अडकल्याने रहिवाशी अत्यवस्थ; कोणीही जखमी नाही, तहसीलदारांची माहिती…
सावंतवाडी,ता.०८: येथील लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या भाग्यलक्ष्मी एम्पायर या बिल्डिंग मधील वीज मीटरांना शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामुळे बिल्डिंगमध्ये राहणारी २५ हून अधिक कुटुंबे धुरात अडकली. त्यात एक महिला अत्यवस्थ झाली. ही घटना आज रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खासकीलवाडा परिसरात घडली. दरम्यान पालिकेचा बंब व नागरिकांनी पुढाकार घेवून धुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचे पदाधिकारी सचिन पाटकर यांनी दिली. सुदैवाने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. कोणी जखमी नाही, असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीनगर येथे असलेल्या भाग्यलक्ष्मी एम्पायरमध्ये असलेले वीज मीटरांनी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यावेळी काही क्षणात बिल्डिंगमध्ये पूर्णता धुरांचे लोट पसरले. नेमके काय झाले, याची काहीच कल्पना तेथील रहिवाशांना नव्हती. त्यामुळे आरडाओरड सुरू झाली. अशा परिस्थितीत काही लोकांनी बिल्डिंगच्या तळमजल्यावर आग लागली अशी ओरड केली. त्यामुळे तेथे अडकलेली कुटुंबे टेरेसवर जाऊन राहिली काही वेळाने त्या ठिकाणी पालिकेच्या बंबाला पाचारण करण्यात आले. बंबाचे कर्मचारी अमोल शितोळे व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर त्यांच्यासह नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी आलीी. त्यानंतर टेरेसवर अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी खाली हलवण्यात आले. काही वेळाने धुराचे लोट कमी झाले. दरम्यान या धुरामुळे महिला अत्यवस्थ झाली. तिला सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन पाटकर, सावली पाटकर, डाॅ. प्रवीण कुमार ठाकरे आदी नागरिकांनी त्या ठिकाणी जमून आज विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. याबाबत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी संपर्क साधून ब्रेकिंग मालवणीला माहिती दिली. ते म्हणाले, आग लागली असली तरी वीज मीटरचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी वीज कंपनीचे कर्मचारी अधिकारी येऊन काम करत आहेत. मोठे नुकसान झालेले नाही. सर्वांना मदतकार्य करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सुदैवाने कोणी यात जखमी झालेले नाही.