शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत “शिक्षक संवाद सभा”

124
2
Google search engine
Google search engine

जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री ठोस निर्णय घेणार – अतुल काळसेकर

सिंधुदुर्गनगरी.ता,२०: जिल्हयातील कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन त्यावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात “संवाद सभेचे” आयोजन करण्यात आले आहे. या सभेला कला, क्रीडा, शिक्षक संघटना, प्रतिनिधी यांच्यासह जिल्हयातील 29 संघटना ना.शेलार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजप नेते अतुल काळसेकर व सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी दिली. ते ओरोस येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
क्रीडा, युवक कल्याण तथा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या स्वतः शिक्षणमंत्री चर्चेतून समजून घेणार असल्याने अनेक विषयांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यातही, शिक्षणमंत्री नाम. आशिष शेलार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने शिक्षणक्षेत्रात जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत असेही काळसेकर म्हणाले.
इथल्या शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य न्याय देता यावा यासाठी आम्ही कुडाळ येथे पूर्वतयारीसाठी दोन दिवस अगोदर विविध शिक्षक संघटनांच्या बैठका घेतल्या होत्या. विविध बैठकांच्या या सत्रात क्रीडा विभाग, क्रीडाशिक्षक, कलाशिक्षक, उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आहे. या पूर्वतयारीतून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिक्षणमंत्री शेलार यांचे उद्या(बुधवारी) सकाळी कोकण कन्या एक्सप्रेसने कणकवलीत आगमन होणार आहे. कणकवली शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता देवगड-जामसंडे येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात कणकवली-विधानसभा बुथस्तरीय संमेलनात ते मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर एक ते दीड वाजेपर्यंत देवगड शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. तीन वाजता ओरोसमध्ये आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा शिक्षण व क्रीडा अधिकाऱ्यांसह शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, क्रीडा उपसंचालक कोल्हापूर यांच्यासह शासकीय आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, उच्च माध्यमिक शिक्षण संघटना, शिक्षण संस्थाचालक यांच्यासोबत “शिक्षक संवाद सभा” होईल. तसेच भेटायला येणाऱ्या शिष्टमंडळाची निवेदने स्वीकारून चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील अनेक विषय पूर्वतयारीने शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला या दौऱ्याचे सकारात्मक फलित मिळेल असा विश्वास भाजपा नेते श्री अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला आहे.