अत्यावश्यक सुविधांवर परिणाम होऊ देऊ नका ; अशोक सावंत यांचे आवाहन…
मालवण, ता. २० : जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन काल जमा केल्याची माहिती संबंधित ठेकेदाराने आपल्याला दिली. त्यानुसार काहींच्या खात्यात मानधन जमा झाले आहे. मात्र जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन जमा झाले नसल्याचे दिसून आल्याने आपण पुन्हा संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला आहे. यात महावितरणला वेठीस धरण्याचे काम होत असल्याने कंपनीच्या नियमानुसार संबंधित कंपनी विरोधात कारवाईचे पाऊल उचलले जाईल. संबंधित ठेकेदारास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यास भाग पाडू असे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान जिल्ह्यातील काही ठराविक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन जमा झाले आहे. आमचे कर्मचारी अद्यापही मानधन जमा न झाल्याने कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले असले तरी अत्यावश्यक सुविधांवर परिणाम होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी असे आवाहन स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी केले आहे.
जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मानधन जमा न केल्याने महावितरणच्या कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात महावितरणच्या ठेकेदाराने काल कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन जमा केले जाईल असे स्पष्ट केले. ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार आपण खात्री केली असता कर्मचाऱ्यांचे मानधन जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आपण मानधन जमा झाल्याचे स्पष्ट केले. मात्र आज जिल्ह्यातील काही तालुक्यामधून मानधन जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मी पुन्हा संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून माहिती घेतली असता मानधन जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. यात ठेकेदाराकडून महावितरणला वेठीस धरले जात असल्याचे दिसून येत असल्याने मी त्या कंपनीच्या विरोधात नियमानुसार कारवाईचे पाऊल उचलले आहे. कोणत्याही परिस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन जमा करण्यास ठेकेदाराला भाग पाडू असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.