माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार
सावंतवाडी ता.२०: मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची नांदेड येथील राष्ट्रीय अधिवेशनात निवड घोषित करण्यात आली.याच अधिवेशनात त्यांनी अध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारली.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडले.राज्यभरातून सुमारे दिड हजार पत्रकार उपस्थित होते.अधिवेशनाचे उदघाटन मॅगेसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांचे हस्ते झाले.
याप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, स्वागताध्यक्ष खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, मावळते अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, कार्याध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, माजी राज्यमंत्री डी.पी सावंत , संजीव जोशी उपस्थित होते.
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, कम्युनिस्ट नेते श्री.भालचंद्र कांगो, जतीन देसाई यांनी माध्यम स्वातंत्र्य केवळ तोंडी लावण्यापुरतेच ? या राजकीय विषयावर परिसंवादात आक्रमक भुमिका मांडली.
२ ऑक्टोबरला धरणे
खुल्या अधिवेशनात पत्रकारांच्या मागण्या, शासनाची अन्याय्य भुमिका यावर चर्चा होऊन पत्रकार संरक्षण विधेयक, रखडल्या बद्दल, तसेच ३०० हून अधिक पत्रकारांची पेन्शनची यादी असताना केवळ २३ पत्रकारांनाच पेन्शन देणार्या शासनाच्या भुमिकेचा निषेध करून पत्रकारांच्या मागण्यांसाठी २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मार्गदर्शन करताना परिषद एकजुटीने सक्षमपणे मागण्यांसाठी लढा उभारेल असा इशारा दिला. तसेच यापुढे पत्रकार परिषदेचे अधिवेशनाचे उदघाटन कोणत्याही राजकीय नेत्याचे हस्ते न करता ज्येष्ठ पत्रकाराचे हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परिषद आणि पत्रकारांना बळ येत्या दोन वर्षात मराठी पत्रकार परिषद अधिक भक्कम करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवून त्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न करेन, प्रसंगी
रस्त्यावर उतरण्यासाठी पत्रकारांनी संघटीत रहावे असे आवाहन नूतन अध्यक्ष गजानन नाईक यांनी अध्यक्षपदी निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना समारोपीय अध्यक्षीय भाषणातून केले.