माहिती अधिकारी पदासह प्रमुख १० पदे रिक्त;पालकमंत्री लक्ष देतील का…?
सिंधुदुर्गनगरी ता.२०: शासन व जनता यांच्यामधील दुवा असणारे जिल्हा माहिती कार्यालय सध्या विविध रिक्त पदांमुळे अडचणीत सापडले आहे. जिल्हा माहिती अधिकारी पदासह प्रमुख १० पदे रिक्त असल्याने या विभागाचा पुरता बोजवारा उडाला आहे.त्यामुळे जनता आणि प्रशासन यामधील संवाद तुटला आहे.शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी करणाऱ्या या कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी पदासह अन्य पद भरण्याकडे पालकमंत्री लक्ष देतील का,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शासनाच्या योजनांची प्रसिद्धी देवून सर्व लाभाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयामार्फत केले जाते. मात्र या कार्यालयातील प्रमुख अधिका-यांची पदे रिक्त असल्याने जवळ जवळ कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर येथे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचे वेतन निघणे कठीण झाले आहे. या विभागात क वर्गातील पाच कर्मचारी वर्ग या विभागाचा कारभार चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. या पाच कर्मचा-यांमध्ये दोन लिपीक,दोन शिपाई व एका चालकाचा समावेश आहे. जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा रितसर कार्यभार कोणाकडेही सोपवला गेला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे या कार्यालयाला वाली कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माहिती आणि जनसंपर्क कार्यालय याबाबत निर्णय घेणार आहे का? तर ही पदे भरण्यासाठी पालकमंत्री दिपक केसरकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. तर गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. या कालावधीत महत्वाची भूमिका बजावणारा माहिती कार्यालय विभाग प्रमुख अधिका-यांवीना ओस पडला आहे. तर सहायक माहिती अधिकारी हे पद गोवा येथील जनसंपर्क कार्यालयाने येथे कामगिरीवर काढले आहे. तर येथील दोन पदांची आस्थापना या कार्यालयात आहे तर सेवा कोल्हापूर व मुंबई येथे बजावत आहेत.