आमसभा घेण्याची हिंमत आमदारांमध्ये नाही ; मंदार केणी यांची टीका…
मालवण, ता. २० : आमदार वैभव नाईक हे मतदार संघाचा विकास करण्यास अपयशी ठरले आहेत. आमसभेची मागणी असताना ती घेण्याची हिंमत आमदारांमध्ये नसल्यानेच त्यांनी पळ काढण्यासाठीच जनसंवाद अभियान घेतल्याची टीका स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केली.
जनसंवाद यात्रेत शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश हे आमच्या पक्षात असलेल्या हेव्यादाव्यांमुळे होत आहेत. त्यामुळे आमदार नाईकांनी त्याचे श्रेय घेऊ नये असा टोला केणी यांनी लगावताना पक्षात हेवेदावे असल्याची कबुली दिली आहे.
येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार नाईक यांच्या जनसंवाद अभियानावर केणी यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी स्वाभीमानचे सरचिटणीस महेश जावकर, उपसभापती अशोक बागवे, नगरसेवक यतीन खोत, संदीप भोजने, छोटू सावजी आदी उपस्थित होते.
श्री. केणी म्हणाले, आमदार नाईक गावागावात जाऊन आपल्याच पक्षाच्या ४०-५० कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानाच्या नाराज असलेल्या काही कार्यकर्त्यांना ते विकासनिधीची पत्रे देत सुटले आहेत. पुढील महिन्यात आचारसंहिता लागणार असल्याने या काळात ही कामे होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थीत केला. केवळ निवडणुकीत कार्यकर्त्यांनी काम करावे या उद्देशानेच आमदारांकडून ही पत्रे वाटली जात आहेत. शिवसेना सध्या पक्षप्रवेशातच अडकली असल्याची टीका त्यांनी केली.
३५० ते ४०० रुपयांची ताडपत्री ५०० रुपयांना विकण्याचा धंदा आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. आमदार नाईक यांच्या संवाद यात्रेत अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी न झालेल्या कामांचा जाब विचारला आहे. देवबाग येथे तर आमदार, खासदारांना पळ काढावा लागला. कोळंब येथील एका जेटीच्या कामात गॉगल गँगने ठेकेदाराकडे पैशाची मागणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी आमदारांसमोर केला. त्यामुळे जनसंवाद यात्रेतून आमदारांच्या गॉगल गँगचे प्रताप समोर आले आहेत. या संवाद यात्रेत आमदार विकासाची गाथा सांगून आपलीच पाठ थोपटून घेत आहेत. प्रत्यक्षात मतदार संघाची गती शून्य आहे असेही श्री. केणी यांनी स्पष्ट केले.