शासकीय यंत्रणेने ग्रामीण भागातील विकास कामे करून ग्रामस्थांना मुलभूत सोयी-सुविधा द्याव्यात

2

दयानंद चौधरी :प्रगत सिंधुदुर्ग संस्थेची वार्षिक सभा संपन्न

मुंबई.ता,२०:ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गावाचा कारभार हाकण्यासाठी सरपंचांची निवड केली जाते. शासन निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडले जात आहेत. सरपंच पदावर बसलेल्या व्यक्तीने विकास कामे करून ग्रामस्थांना मुलभूत सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. यात राज्य सरकारने १४ व्या वित्त आयोगांतर्गत सर्व निधी हा थेट ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे १४ वित्त आयोगाचा सर्वच निधी हा थेट ग्रामपंचायत कार्यालयाला जमा होतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.या निधीतून गावात विविध विकास करणे गरजे असते. मात्र, ‘खुर्ची’त बसलेल्या काही सरपंचांनी व ग्रामसेवकांनी शासकीय नियमांनाच धाब्यावर बसवून कामकाज केल्याचे चित्र आहे. अशा सरपंचांचे पितळ उघडे पाडण्याचे काम प्रगत सिंधुदुर्ग संस्थेच्या माध्यमातून केले जाईल, असे प्रतिपादन प्रगत सिंधुदुर्गचे मुंबई अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी दादर येथे केले.
प्रगत सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन छबिलदास हायस्कूल दादर ,येथे करण्यात आले होते, त्याप्रसंगी श्री. चौधरी बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर,
प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सीईओ राजन रेडकर, शिवसेना शाखा क्र. ९० चे शाखाप्रमुख शोभन तेंडोलकर, म.न.से.युनियन नेते सुमंत तारी, शिवसेना कार्यालय प्रमुख, कल्पेश आजरेकर, पत्रकार किशोर गावडे, दिलीप लाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
दयानंद चौधरी, आपल्या भाषणात उल्लेख करताना म्हणाले,संस्थेने वर्षोनुवर्षे खितपत पडलेले चाकरमान्यांचे गावाकडील जमिनीचे,घरांचे,व इतर प्रश्न कसे सोडवले,हे नावानीशी सभेपुढे मांडले, व हे प्रश्न सोडवत असताना, जि.प.सिंधुदुर्गचे अधिकारी सुनील रेडकर यांनी एस्ट्रोसिटी,दोन कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, या माध्यमातून कसा त्रास दिला हेही सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारे संस्था आपल्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन चौधरी यांनी दिले.
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागीय सिईओ राजन रेडकर यांनी आपल्या भाषणात ग्रामपातळीवर विविध सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात, याकरिता केंद्रीय वित्तिय आयोग व ग्रामनिधी मधून निधी ग्रामपंचायतीस उपलब्ध होतो. त्याप्रमाणे त्या विविध विकास कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार होऊ नये व त्या कामात पारदर्शकपणा असणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तसेच गावात होणाऱ्या विकास कामांवर एक दक्ष नागरिक म्हणून नजर ठेऊन त्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजवावे व सिंधुदुर्ग जिल्हा हा भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत बनविण्याकरिता प्रयत्न करावा असे आवाहन केले.
सुरवातीस संस्थेचे सचिव मोहन रणसिंग यांनी वर्षभरातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला,तर खजिनदार संतोष नाईक यांनी वार्षिक जमाखर्च सभेपुढे मांडला तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी श्री. राजन रेडकर यांचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला.

5

4