माजी नगराध्यक्ष राजन सरमळकर हल्ला प्रकरण…
मालवण, ता. २० : माजी नगराध्यक्ष राजन सरमळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याच्या आरोपातून राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, संतोष जुवाटकर, महेश उर्फ आपा जोशी यांच्यासह अन्य ८ जणांची जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ .पी. आर. कदम यांनी निर्दोष मुक्तता केली.
अन्य आरोपींमध्ये बॉनी काळसेकर, प्रविण वाघ (मयत), हरिश्चंद्र बटाव, संतोष मुळेकर, सचिन काटकर, दिपक खैरे, विनायक पडवळ यांचा समावेश आहे. महेश अंधारी, संतोष जुवाटकर व इतर आठ आरोपींकरीता अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. अशपाक शेख, अॅड. तुकाराम धुरी, अॅड. सुहास साटम आदींनी सहकार्य केले तर आपा जोशी यांच्याकरीता अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे यांनी काम पाहिले. ही घटना ८ जून २०१२ रोजी घडली होती. याबाबतची फिर्याद राजन सरमळकर यांनी पोलिसात दिली होती.
फिर्यादी सरमळकर व आरोपी महेश अंधारी यांच्यामध्ये जमीन जागेवरून वाद होते. याचा राग मनात धरुन आरोपी बाळू अंधारी यांनी संतोष जुबाटकर व मनोज कांबळी यांना हाताशी धरुन संगनमताने फिर्यादीला ठार मारण्याचा कट रचून त्यासाठी इतर आरोपींना आर्थिक प्रलोभने दाखवून व त्यांची मदत घेऊन सरमळकर हे हॉटेल विलास विश्रांती गृह येथे चहा पिण्यासाठी बसलेले असताना संशयित आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले होते. फिर्यादी सरमळकर, हॉटेलचे मालक विलास सामंत, डॉ. नागवेकर व तपासिक अंमलदार एस. आर. साबळे यांची प्रमुख साक्ष नोंदविण्यात आली. यात आरोपीचा बचाव मांडत असताना घटनेच्या वेळी बाळू अंधारी हे कोल्हापूर येथे त्यांची आई रुग्णालयात दाखल असल्याने तिचे सेवेकरीता होते. त्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे फिर्यादी सरमळकर यांनी खोटी फिर्याद देवून महेश अंधारी यांना खोडसाळरित्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल असून फिर्यादी राजन सरमळकर यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे डॉ. नागवेकर यांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये मध्ये नमूद जखमा व फिर्यादी यांनी केलेले हल्याचे वर्णन व त्यामुळे झालेल्या जखमा वेगळे असल्याचे व त्यामुळे ही घटना बनावट असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे फिर्यादी यांनी आपल्या पुरवणी जबाबामध्ये आपण भांबावून गेल्याने वर नमूद आरोपींची नावे फिर्याद देतेवेळी नमूद केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.