कणकवली, ता.२१ : स्वतंत्र कोकण विद्यापीठ रत्नागिरी येथे त्वरित सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना दिला.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांना भेटी दिल्या. प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या संयुक्त सभा घेतल्या. सर्वांचा एकच सूर होता, कोकणच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रत्नागिरी येथे ह्या तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे. जर शासनाने त्वरित कार्यवाही केली नाही तर आंदोलन करायचे. प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तहसीलदार, कलेक्टर, प्रांत कार्यालयांमार्फत मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी निवेदने पाठवली आहेत. गेल्या विधानसभा व विधानपरिषद अधिवेशनाच्या वेळी लोकप्रतिनिधींनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठ रत्नागिरी येथे होण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. परंतु पुढील कार्यवाही अद्यापी झाली नाही, ही खेदाची गोष्ट आहे.
विदर्भ, कोकण, मराठवाडा, प.महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे चार प्रादेशिक विभाग आहेत. कोकण सोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही, हा महाराष्ट्राचा धुरंदर राजकारण्यांनी कोकणावर केलेला अन्यायच नव्हे तर अत्याचार आहे. कोकण महसूल विभागात मुंबई विद्यापीठ आहे पण ते भारतीय विद्यापीठ झाले आहे. त्यात देशातील आणि विदेशातील लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे कोकणी विद्यार्थी दुर्लक्षित होतो. प्राध्यापक, पालक, प्राचार्य, विद्यार्थ्यांना दोडामार्ग, सावंतवाडी पासून मुंबई पर्यंत जाऊन येण्यासाठी हजार किलो मीटरचा प्रवास करावा लागतो. वेळ व पैसा यांचा अपव्यय होतो. शैक्षणिक दर्जाबरोबर वेळच्या वेळी परीक्षा घेऊन त्यांचे योग्य वेळी निकाल लावणे. उच्च शैक्षणिक दर्जा ठेवणे व संशोधन करणे ह्या तिन्ही गोष्टीत विद्यापीठला अपयश आले आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने जगातील पहिल्या २०० विद्यापीठात भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव नाही. भारतातील गुणवत्ताधारक विद्यापीठात सातवा नंबर पुणे विद्यापीठाचा आहे आणि मुंबई विद्यापीठ पहिल्या १०० विद्यापीठातही नाही. ही शर्मेची गोष्ट आहे. आज कोकण बोर्डाचे महाराष्ट्रात दरवर्षी एस.एस.सी., एच.एस.सी. चे निकाल प्रथम क्रमांकाचे असतात, कारण कोकणी विद्यार्थी बुद्धिमान व प्रतिभावंत आहेत. कोकणी विद्यापीठ झाल्यानंतर जगातील प्रथम २०० विद्यापीठात कोकणाचा वरचा क्रमांक असेल अशी आमची खात्री आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये विद्यापीठाची केवळ उपकेंद्रे सक्षम करून ती विद्यापीठाची जागा घेऊ शकणार नाहीत, हे सुस्पष्ट आहे. तेव्हा तसे असते तर महाराष्ट्रात एक मुंबई विद्यापीठ ठेवून सर्वत्र विद्यापीठे न निर्माण करता सर्वत्र उपकेंद्रे सुरू केली असती, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रत्नागिरीत स्वतंत्र कोकण विद्यापीठच पाहिजे. त्यासाठी तीव्र लढ्याची तयारी आम्ही ठेवली आहे. असे निवेदन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना देण्यात आले.
यावेळी अतुल काळसेकर, युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.