धनदांडग्या लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

149
2
Google search engine
Google search engine

समीर नलावडे यांचा आरोप:नगरपंचायतीला विश्वासात न घेता केला सर्वे

कणकवली, ता.२१ : केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवुन खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र ही योजना राबवित असताना सर्व्हे करणार्‍या कर्मचार्‍यांनी धनदांडगे आणि सरकारी नोकरी त्याचप्रमाणे सफेद रेशनकार्ड असणार्‍यांचा समावेश करुन दारीद्ररेषेखालील नागरीकांना त्याचप्रमाणे पिवळ्या व केशरी कार्डधारकाना या योजनेपासुन वंचित ठेवण्याचे काम केले आहे. या योजनेसाठी सर्व्हे करताना नगरपंचायतीला विश्वासात न घेता हा सर्व्हे केल्याने खरे लाभार्थी मात्र योजनेपासुन वंचित राहीले असुन धनदांडग्यांचा यामध्ये समावेश झाला असल्याने याबाबत आपण जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असुन ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यानी दिली.

राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेप्रमाणेच आयुष्यमान भारत योजनेतही पिवळ्या व केशरी कार्डधारकांचा समावेश व्हावा ही आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे यानी आयुष्यमान भारत योजनेच्या यादीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरपंचायत गटनेते, बांधकाम सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडु गांगण उपस्थित होते.
खरे लाभार्थी वंचितच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबतचा दृष्टीकोण हा फारच चांगला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र या योजनेची यादी बनविताना शासनस्तरावर निर्माण झालेल्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे. कणकवली शहरातील धनदांडग्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. दारीद्ररेषेखालील यादीचा सर्व्हे 2005 – 06 मध्ये झाला. त्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने 2010 साली एसईसीसी (सोशल इकॉनॉमिक्स कास्ट सर्व्हे) करण्यात आला. हा सर्व्हे करताना नगरपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. वास्तविक आयुष्यमान भारतच्या या यादीत दारीद्ररेषेखालील सर्व कुटुंबाचा समावेश होणे बंधनकारक होते. परंतु प्रत्यक्षात मात्र काही कुटुंबांची नावे वगळण्यात आली आहेत. 2010 सालच्या यादीत कणकवली शहरातील धनदांडगे, व्यापारी, व्यावसायीक आणि शासकीय कर्मचारी त्याचप्रमाणे अधिकार्‍यांची कुटुंबे यांचाही समावेश आहे. त्यामुळे ज्याला लाभ मिळायला हवा होता त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळताना दिसत नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कणकवली शहरात एकुण 947 कुटुंबांचा या यादीत समावेश आहे. म्हणजेच कणकवली शहरातील जवळपास 3500 नागरीकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु ही यादी सदोष असल्याने खरे लाभार्थी योजनेपासुन वंचितच राहीले असल्याचे सांगताना नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, डॉ.अविनाश पाटील हे या योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणुन काम पाहत आहेत. ही यादी करताना 7 प्रकारच्या अटींचा अभ्यास केल्याचे सांगण्यात येते. मग या यादीत धनदांडग्यांची नावे कशी आणि खरे लाभार्थी कसे वगळले गेले असा सवाल करताना ते म्हणाले, सर्व्हे करणार्‍यांनी घरात बसुन ही यादी केली नाहीना असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेला आमचा विरोध नाही मात्र ज्या संस्थेने अथवा कर्मचार्‍यानी ही यादी बनविली होती त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे अन्यथा खर्‍या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणारच नाही असेही समीर नलावडे यानी स्पष्ट केले.
महात्मा फुले योजनेप्रमाणे लाभ द्या
राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजना अंमलात आणली. या योजनेत पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला दिडलाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार उपलब्ध होतात. राज्य सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना गृहीत धरुन ही योजना राबविली असताना आयुष्यमान भारतच्या यादीत घोळ कसा असे सांगताना समीर नलावडे म्हणाले, महात्मा फुले ज्योतिबा फुले आरोग्य योजनेप्रमाणे आयुष्यमान भारत योजनेतही पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांचा समावेश करावा त्याचप्रमाणे दारीद्ररेषेखालील नागरीकानी या योजनेचा लाभ मिळावा ही आपली मागणी असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांकडे तक्रार करणार
आयुष्यमान भारत योजनेबाबत खरे लाभार्थी वंचित राहुनये यासाठी आणि सर्व्हे करणार्‍यानी केलेल्या चुकीमुळे खर्‍या लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे ट्टिटरच्या माध्यमातुन पंतप्रधानांचे लक्ष वेधणार असल्याचे यावेळी समीर नलावडे यानी सांगितले.