जीवनगौरव वगळता जिल्हा बँकेच्या पुरस्कारांचे वितरण

2

36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीत संपन्न

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची 36 वी वार्षिक सर्वासधारण सभा सिंधुदुर्गनगरीतील शरद कृषि भवनच्या सभागृहात बुधवारी संपन्न झाली. यावेळी जीवनगौरव वगळता बँकेच्या सर्व पुरस्कारांचे वितरण नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय थुटे यांच्याहस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक रामचंद्र मर्गज, विकास सावंत, गुलाबराव चव्हाण, आत्माराम ओटवणेकर, अविनाश माणगावकर, विद्याप्रसाद बांदेकर, दिगंबर पाटील, नीता राणे, प्रकाश मोर्ये, प्रज्ञा परब, अतुल काळसेकर, प्रकाश गवस, प्रमोद धुरी, राजन गावडे, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, शरद सावंत यांच्यासह अन्य बँक अधिकारी, बँकेचे सभासद व संस्था सभासद उपस्थित होते.
2019-20 या वर्षासाठी जिल्हा बँकेने स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार रायगड, अलिबाग येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, कै शिवरामभाऊ जाधव स्मृती प्रित्यथ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार कॅथाॅलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि सावंतवाडी यांना, कै डी बी ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी कर्मचारी पुरस्कार तळवडे वि. का. स. से.सो. लिमिटेड संतोष यशवंत राऊळ यांना, कै केशव रावजी राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार देवगड अर्बन को.ऑ.बॅक अध्यक्ष दिलीप धोंडूशेट आचरेकर उर्फ भाई आचरेकर यांना, तर कै भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुरस्कार असरोंडी येथील विजय कालीदास सावंत यांना जाहीर केला होता. त्याचे वितरण यावेळी करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पवृक्ष, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले नाही. हे वितरण नंतर विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ प्रसाद देवधर, संतोष गाडगीळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सस्थांच्यावतीने उपस्थित सर्व संचालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पाच वर्ष सहकार्याप्रमाणे पुढेही सहकार्य करा :- सतीश सावंत
यावेळी बोलताना सतीश सावंत यांनी, अलीकडेच आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या दुग्धव्यावसायिकांना मोफत खाद्य देण्याचा, तसेच या आपत्तीत मयत झालेल्या शेतकरी व खातेदार यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील तरुणांना अधिकारी पदाच्या नोकऱ्या मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनासाथी जिल्हा बँक पुढील दोन महिन्यात ई-लायब्ररी सुरु करणार आहे. यासाठी प्रसिद्ध व मोठ्या मार्गदर्शन केंद्राशी समन्वय साधुन एमपीएससी सारख्या परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे सांगतानाच गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील सभासदानी आमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही बँकेच्या कारभाराला गालबोट न लावता काम केले. विद्यमान संचालकांची ही शेवटची वार्षिक सभा आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात केलेल्या सहकार्याप्रमाणे यापुढेही असेच सहकार्य करा, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.

1

4