भात शेतीला सध्याच्या तिप्पट नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय लवकरच : कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे

187
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गात १७ हजार ६१६ हेक्टर जमिन पुरपरिस्थितीमुळे बाधिक : भातशेती प्रमाण अधिक

वेंगुर्ले.ता,२१: महाराष्ट्रात यावर्षी अतिपर्जन्यवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही झळ पोहचली आहे. कृषि विभागामार्फत आत्तापर्यंत जवळजवळ २६१७ पंचनामे पुर्ण झाले असून अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरुच आहे. या झालेल्या पंचनाम्यानुसार सुमारे १७ हजार ६१६ हेक्टर जमिन बाधित झाली असून यामध्ये भात शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सुमारे १ हजार ६११ कुटुंबांनाही या पुराचा फटका बसून त्यांच्यापैकी काहिंची रहाती घरे अंशता तर काहिंची पुर्णता घरे कोसळली आहेत. या सर्वच शेतकरी व नुकसानग्रस्त ग्रामस्थांना एन.डी.आर. एफ च्या नॉम्स प्रमाणे तातडीची नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या बाधित शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन पावले उचलत असून येत्या दोन दिवसात भात शेतीला सध्या जेवढी नुकसानभरपाई दिली जाते त्याच्या तिप्पट नुकसान भरपाई देण्याबाबतच शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री ना. बोंडे यांनी आज प्रथम वेंगुर्ले-वेतोरे येथे भेट देऊन तेथील शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात त्यांनी आंबा-काजू विचारमंच आयोजित चर्चासत्रात भाग घेऊन शेतकरी बागायतदार यांचे प्रश्न समजून घेतले. यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या सोबत पालकमंत्री दिपक केसरकर तसेच कृषिचे अधिकारी, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. बी. एन. सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, नगराध्यक्ष दिलीप गिरप, सचिव शरद चव्हाण, उपनगराध्य अस्मिता राऊळ, तालुकाध्यक्ष बाळू देसाई, तालुकाप्रमुख यशवंत परब, आबा कोंडसकर, आदि उपस्थित होते. ना. श्री. बोंडे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ज्या ज्या शेतकऱ्यांची पुर्णता शेती पावसात नष्ट झाली आहे, त्यांना रब्बी हंगामासाठी धान्य पुरवीले जाणार आहे. अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना असून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. आज कृषि कार्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे शासनाच्या कृषि योजना तळागळापर्यंत पोहचत नाही असे विचारले असता कृषि सेवक भरण्यासाठी पदवी की पदवीका आवश्यक या मुद्यावरुन त्यांची संघटना न्यायालयात गेल्यामुळे हि भरती प्रक्रीया रखडली आहे. मात्र त्यावरही येत्या काहि दिवसात तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले. सध्या तातडीची मदत म्हणून १० हजार ते १५ हजार पर्यंत करण्यात येत आहे. जिल्ह्यात कणकवलीमध्ये २६ कुटुंब, मालवणमध्ये ३५० कुटुंब, कुडाळमध्ये ३२९ कुटुंब, सावंतवाडीमध्ये ४२१ कुटुंब, दोडामार्गमध्ये ३९६ कुटुंब व वेंगुर्लेमध्ये ८९ कुटुंबांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या कुटुंबापैकी बऱ्याचजणांच्या रहात्या घरांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यांना पुन्हा सावरण्यासाठी आम्ही शासन म्हणून नक्कीच प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान पुर्वी धोकादायक घरांना नुकसानीपोटी ९५ हजारा पर्यंत नुकसान भरपाई दिली जात होती आता ती वाढ करुन अडीच लाखापर्यंत करण्यात आल्याचे यावेळी केसकर यांनी सांगितले.
*चिबुड,कणगी या नुकसाग्रस्त फळांनाही नुकसानभरपाई देणार*
सध्यस्थितीत शासनाकडून देण्यात येणाऱ्या फळांच्या नुकसानीमध्ये चीबूड, कणगी या फळांचा समावेश नाही. वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावात या फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांबरोबर आज ना. बोंडे यांनी चर्चा करुन या फळांनाही शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले.
दरम्यान बागायतदार चर्चासत्रात बोलताना त्यांनी सध्या वीमा कंपनी पिक वीमा देताना शेतकऱ्यांची फसवणूक करतात अशा तक्रारी आहेत. त्या संबंधी आपण जिल्हा कृषि कार्यालयात वीमा कंपनींचा एक प्रतिनिधी नेहमीसाठी उपस्थित ठेवला आहे. त्यांच्याकडून जर प्रश्न सुटत नसतील तर केंद्रस्तरीय हा प्रश्न सोडवला जाईल असे ना. बोंडे यांनी सांगितले. कोकणात अनेक प्रश्न आहेत.त्यात काजुला हमीभाव मिळावा, आंबा-काजु कमिटीवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घ्यावेत, जिल्ह्याच्या कृती आराखड्यात बांबुचे नाव समाविष्ट करावे,निळेली येथे बांबु संशोधन केंद्र मंजूर करावे, फळांवरील किटकनाशकांवर सबसिडी मिळावी, मोठ्या शहरामध्ये आंबा विक्रीसाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन मिळावी या सर्वांबाबत आम्ही वेगळी बैठक घेवून शेतकरी बागायतदारांना फायदा करुन देणारा निर्णय घेवू कारण मी पण शेतकरी आहे असे ना. बोंडे यांनी सांगितले.

\