Sunday, March 16, 2025
Google search engine
HomeUncategorizedजिल्ह्यातील ९९ अंगणवाडया होणार हायटेक

जिल्ह्यातील ९९ अंगणवाडया होणार हायटेक

जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर; महिला व बाल कल्याण समिती सभेेेत माहिती

सिंधुदुर्गनगरी.ता,२२:  जिल्हा नियोजन मंडळमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९९ अंगणवाडी केंद्रांना डिजिटल बनविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या अंगणवाडया हायटेक होणार आहेत, अशी माहिती गुरुवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत देण्यात आली.
सभापती पल्लवी राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात संपन्न झालेल्या या सभेला प्रभारी अधिकारी विनीत म्हात्रे, सदस्य माधवी बांदेकर, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, वर्षा कुडाळकर, पल्लवी झिमाळ, शर्वरी गांवकर यांसह तालुका प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डिजिटलसाठी मंजूर झालेल्या ९९ अंगणवाडी केंद्रांसाठी कुडाळ, कणकवली व कुडाळ तालुक्यांतून प्रत्येकी १३ तर मालवण, देवगड, वेंगुर्ले, दोडामार्ग व वैभववाडी या पाच तालुक्यांतून प्रत्येकी १२ अंगणवाडी केंद्र निवडण्यात येणार आहेत. या सुविधेसाठी अंगणवाडीला स्वताची इमारत, शौचालय व अन्य सुविधा असणे बंधनकारक आहे. अशा अंगणवाडी केंद्रांचा शोध घेवून यादी तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यूनिटच्या माध्यमातून पुरविण्यात येणार पोषण आहार
कमीत-कमी पाच किंवा जास्तीत-जास्त आठ अंगणवाडी केंद्रांचे एक यूनिट तयार करून यापुढे अंगणवाडी मुलांना पोषण आहार पुरविण्याचा आदेश शासनाने काढला आहे. एवढ्या अंगणवाडया एका गावात उपलब्ध न झाल्यास लगतच्या गावातील अंगणवाडया या यूनिटला जोडण्यात येणार आहेत. मात्र युनिटच्या माध्यमातून बचतगट अन्न शिजवून पुरविणार आहेत. यासाठी सबंधित बचतगटांनी किचन शेडसह अन्य आवश्यक सुविधांची पूर्तता करणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे मुलांना वेळेत आहार पोहोचणार नाही, असा संशय माधुरी बांदेकर यांनी व्यक्त केला. तसेच आहार शिजविल्यानंतर कराव्या लागणाऱ्या वाहतुकीचा खर्च मिळणार का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
आधारभूत किंमत निश्चित
या सभेत महिला व बाल विकास विभागाच्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आधारभूत किंमती निश्चित करण्यात आल्या. सायकल ३८०० रूपये, घरघंटी १२ हजार ६०० रूपये, शिलाई मशीन ५३२५ रूपये, एमएससीआयटी ३५०० रूपये, फॅशन डिझायनिंग ३५०० रूपये, फळ प्रक्रिया ३३०० रूपये, ब्यूटी पार्लर ३००० रूपये अशा प्रकारे प्रतिलाभार्थी अनुदान निश्चित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments